ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होणे ही एक अपूर्वाईच, प्रत्येकाच्या आयुष्यातील हा स्वर्गीय सुख देणारा क्षण, ही संधी रोहित शर्माने गुरुवारी आपले अद्वितीय विश्वविक्रमी दुसरे द्विशतक झळकावत क्रिकेट जगताला दिली. तडाखेबंद, खणखणीत, बेधडक फलंदाजी करतानाही फटक्यांमध्ये असलेली सहजता, असे रोहितच्या २६४ धावांच्या विश्वविक्रमी, अद्भुत, अप्रतिम, ऐतिहासिक खेळीचे वर्णन करता येईल. गोलंदाजांना लोटांगण घालायला लावत रोहितने श्रीलंकेच्या गोलंदाजीचा चुराडा केला, तर दुसरीकडे क्रिकेट हा फक्त फलंदाजांचाच खेळ आहे, हे पुन्हा एकदा जनमानसावर बिंबवले. त्याचबरोबर तब्बल १० आठवडय़ांनंतर संघात पुनरागमन कसे करायला हवे, याचा उत्तम वस्तुपाठही घालून दिला. रोहितच्या दुसऱ्या द्विशतकाच्या जोरावर भारताने श्रीलंकेविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना ५ बाद ४०४ अशी दमदार धावसंख्या उभारली. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव २५१ धावांवर संपुष्टात आला आणि भारताने १५३ धावांनी दणदणीत विजय मिळवला. द्विशतकवीर रोहितलाच सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
शिखर धवनच्या जागी सलामीला आलेल्या रोहितला चार धावांवर असतानाच पहिले जीवदान लाभले, थिसारा परेराने ‘थर्ड मॅन’ला सोडलेला झेल ही चूक श्रीलंकेला एवढी महागात पडेल, असे वाटले नव्हते; पण या जीवदानाचा पुरेपूर फायदा रोहितने उचलला. जीवदानानंतर संयत खेळ करत रोहितने अर्धशतकाच्या दिशेने कूच केली. ७२ चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावल्यावर रोहितने आपल्या पोतडीतले फटके हळुवारपणे बाहेर काढले. शतकासमीप आल्यावरही त्याने फटक्यांना मुरड घातली नाही. शतक झळकावल्यावर रोहितची फलंदाजी अधिक खुलली. त्यानंतर प्रत्येक फटका श्रीलंकेच्या गोलंदाजीवर प्रहार करत असला तरी त्यामधला अलवारपणा भारतीयांना सुखावणारा होता. श्रीलंकेच्या गोलंदाजीला निष्प्रभ करत रोहितने दीड शतकाला गवसणी घातली आणि आता हा दुसरे द्विशतक झळकावणार का, या चर्चेला ऊत आला. क्रिकेटचाहत्यांना नाराज न करता ‘डीप पॉइंट’ला जेव्हा रोहितने चौकार लगावत द्विशतक झळकावले तेव्हा क्रिकेटचाहत्यांचे डोळे आनंदाने पाणावले.
दीड शतक झळकावल्यावर भारताचा कर्णधार महेंद्रसिंगने हा नाबाद राहिला तर २५० धावासुद्धा करेल, असे ट्विट केले आणि रोहितने तेही सत्यात उतरवले. दुसरे द्विशतक झळकावण्याचा पहिला मान रोहितने पटकावला, त्याचबरोबर वीरेंद्र सेहवागच्या २१९ धावांचा विश्वविक्रमही मोडीत काढला. डावाच्या अखेरच्या चेंडूवर रोहितने आपली विकेट गमावली. रोहितने १७३ चेंडूंमध्ये ३३ चौकार आणि ९ षटकारांसह २६४ धावांचा एव्हरेस्ट उभारला.
कर्णधार विराट कोहलीने ६ चौकारांसह ६६ धावांची खेळी साकारली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी २०२ धावांची भागीदारी रचली.
भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहितच्या द्विशतकाने गांगरलेल्या श्रीलंकेची सुरुवात चांगली झाली नाही. ४८ धावांमध्येच श्रीलंकेचे चार बळी बाद झाले आणि त्यांनी त्या वेळीच सामना गमावला.
अँजेलो मॅथ्यूज (७५) आणि लहिरू थिरीमाने (५९) यांनी अर्धशतके झळकावली खरी, पण विजयासाठी ती तोकडीच ठरली. भारताकडून युवा वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णीने सर्वाधिक चार बळी मिळवले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा