परिस्थिती माणासाला हतबल करून सोडते, होत्याचं नव्हतं होतं. पण काही माणसं परिस्थितीला न जुमानता आपली वाट शोधतात आणि त्यावर मार्गक्रमण करत यशाचं शिखर गाठतात. पण काही गोष्टींचे अर्थ अनुभूती आल्याशिवाय कळत नाहीत. ‘खडतर’ हा शब्द वापरणाऱ्यापेक्षा अनुभवणाऱ्याला जास्त कळतो. रोहित शर्माचेही तसंच, पण सध्याच्या घडीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोनदा द्विशतक ठोकणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे.
रोहितच्या बाबांनी कामामुळे बोरिवलीचं घर सोडण्याचा निर्णय घेतला, पण हा पहिलाच नातू असल्याने त्याच्या आजी-आजोबांनी त्याला आपल्याकडे ठेवून घेतलं. रोहित तसा खोडकर. इमारतीतील मुलांना जमा करायचा. इमारतीच्या पाण्याच्या टाकीवर गोलंदाजी करायला लावायचा, पाण्याचा टाकीचा दरवाजा हा त्याचा स्टंप. ‘माझी बॅट असल्याने मी पहिल्यांदा फलंदाजी करणार आणि बाद झालो की तुम्ही फलंदाजी करायची,’ असं सांगायचा. पण बाद झाला की घरी धूम ठोकायचा. इमारतीच्या लोकांनी बऱ्याच तक्रारी त्याच्या घरी केल्या होत्या. घरची परिस्थिती बेताचीच. पण तरीही त्याचे काका रवी शर्मा यांनी ८०० रुपये जमवून त्याला घराच्या बाजूच्या जनरल अरुण कुमार वैद्य मैदानातील बोरिवली स्पोर्ट्स कल्चरल सेंटरमध्ये क्रिकेटच्या शिबिराला पाठवलं, ते त्याच्या तक्रारी येऊ नयेत म्हणून. तिथे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी त्याची गोलंदाजी पाहिली आणि त्याला स्वामी विवेकानंद शाळेमध्ये प्रवेश मिळवून दिला. त्या वेळी त्याच्या काकांची महिना १७५ रुपये शुल्क भरण्याचीही परिस्थिती नव्हती. प्रशिक्षकांनी शाळेच्या संचालकांना विनंती करून त्याला मोफत प्रवेश मिळवून दिला. इथून तिथून जमवत त्यानं क्रिकेटचं साहित्य गोळा केलं. पहिल्या हंगामात तो गोलंदाज म्हणून खेळला. पण दुसऱ्या हंगामाच्या सुरुवातीला त्याचा फलंदाजीचा सराव पाहून लाड सर थक्क झाले आणि त्याला फलंदाजी करायला लावली, त्यानंतर त्याला सलामीलाही पाठवलं आणि रोहितने या संधीचा फायदा उचलला. पण एका सामन्यात विकेट फेकल्यामुळे लाड सरांनी मुस्काटात मारली आणि तेव्हापासून रोहित गंभीरपणे क्रिकेट खेळायला लागला.
मग हॅरीस, गाइल्स, मुंबई रणजी संघापासून ते थेट पहिल्या ट्वेन्टी-२० विश्वविजयी संघापर्यंत रोहितने मजल मारली. पण तो विश्वचषक जिंकल्यावर रोहितकडे पैसा आला आणि त्याचं क्रिकेटवरून लक्ष विचलित व्हायला लागलं. त्यानुसार त्याची कामगिरी ढासळत गेली. काही वेळेला पदार्पणाची मिळालेली संधी त्याला दुखापतीमुळे गमवावी लागली, तर काही वेळेला स्वाभावामुळे त्याने संधी गमावली. काही वाईट संगतही होती, पण त्याने ती वेळीच सोडली. २०११च्या विश्वचषक संघात आपलं नाव नसल्याचं रोहितला समजलं, तेव्हा त्याला मोठा धक्का बसला. त्या वेळी लाड सरांनी त्याची पुन्हा शिकवणी घेतली, ‘सुरात गायला लागल्यावर सुरांना आपल्या तालावर नाचवायचं नसतं, तर त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यायचा असतो’ हे लाड सरांनी त्याला सांगितलं होतं. त्याचबरोबर मुंबई इंडियन्स संघातील प्रवेशाचाही त्याला फायदा झाला. सचिनची क्रिकेटमधली शिस्त, समर्पण त्याने पाहिलं आणि त्याला प्रेरणा मिळाली. त्याचबरोबर मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी आल्यावर रोहितमध्ये बदल झाला आणि क्रिकेटबाबतीत तो अधिकाधिक गंभीर झाला. सुरुवातीला सर्वात सातत्य नसलेला फलंदाज, असं रोहितबद्दल बोललं जायचं. पण त्यानंतर ५०-८०-१००.. ते १४१, २१९ आणि थेट २६४ धावांपर्यंत रोहितने मजल मारली.
परिस्थितीवर मात करत माणूस गगनभरारी कशी घेऊ शकतो, याचं जिवंत उदाहरण म्हणजे रोहित. आता तर त्याने त्याचाच आदर्श असलेल्या सचिनलाही द्विशतकाच्या विक्रमाच्या बाबतीत मागे टाकलं आहे. पण तरीही रोहित पूर्वीसारखा गाफील दिसत नाही. द्विशतकानंतर ‘मला अजून बरंच काही मिळवायचं आहे’ हे त्याचं वाक्य बरंच काही सांगून जातं. रोहितच्या बाबतीत ‘देर आए, पर दुरुस्त आए’ असं म्हणता येईल. कारण विश्वचषक काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. आपल्या कामगिरीच्या जोरावर त्याने विश्वचषकासाठी आपली दावेदारी सिद्ध केली आहे. आता निवड समितीवर त्याची निवड अवलंबून असेल. आपलं विश्वचषकात खेळण्याचं स्वप्न साकार करण्यासाठी रोहितने अथक मेहनत घेतलेली आहे. बऱ्याच ठेचा लागून सावरलेला रोहित पुन्हा एकदा गाफील राहणार नाही. हा विश्वचषक त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा मैलाचा दगड ठरू शकेल. विश्वचषकात देशाच्या विजयात त्याने योगदान दिलं तरच त्याचा संघर्षमय प्रवास सार्थकी लागला, असं म्हणू शकतो.
रोहितची संघर्षगाथा!
परिस्थिती माणासाला हतबल करून सोडते, होत्याचं नव्हतं होतं. पण काही माणसं परिस्थितीला न जुमानता आपली वाट शोधतात आणि त्यावर मार्गक्रमण करत यशाचं शिखर गाठतात.
First published on: 16-11-2014 at 07:31 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit sharmas struggle