जोहान्सबर्ग येथील पहिल्या एकदिवसीय लढतीत सपाटून मार खाल्यानंतर तीन सामन्यांच्या या मालिकेत आव्हान टिकवून ठेवण्यासाठी भारताला ‘करो या मरो’ची लढाई लढावी लागणार आहे. सलामीच्या सामन्यातच भारतीय गोलंदाजांच्या मर्यादा स्पष्ट झाल्यानंतर आता भारताला रविवारी होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात गोलंदाजीच्या समस्येवर मात करावी लागणार आहे.
वर्णभेदीविरोधी लढय़ाचे अध्वर्यु नेल्सन मंडेला यांना समर्पित करण्यात आलेल्या या मालिकेत भारताला विजय मिळवणे आवश्यक आहे. गेल्या आठवडय़ात दरबनमध्ये पावसाने हजेरी लावल्यामुळे येथील वातावरण भारतीयांसाठी पोषक असल्याचे बोलले जात आहे. गेल्या सामन्यात क्विंटन डि कॉक, ए. बी. डीव्हिलियर्स आणि जेपी डय़ुमिनी यांनी भारतीय गोलंदाजीच्या चिंधडय़ा उडवल्या. सुमार गोलंदाजी आणि युवा खेळाडूंना परदेशातील वातावरणाशी जुळवून घेताना येत असलेल्या अडचणी, हे भारताच्या पराभवाचे प्रमुख कारण ठरले.  
पहिल्या सामन्यात उमेश यादवला संघात समाविष्ट न करून घेण्याची चूक भारताला भोवली. आर. अश्विन आणि रवींद्र जडेजा यांच्यापैकी एकाच्या जागी उमेश यादवला संधी मिळण्याची शक्यता आहे. भारतीय खेळपट्टय़ांवर सव्वाशेर ठरलेले शिखर धवन, रोहित शर्मा आणि विराट कोहली दक्षिण आफ्रिकेत मात्र चमक दाखवू शकले नाहीत.
सामन्याची वेळ : दुपारी १.३० वा.पासून
थेट प्रक्षेपण : टेन क्रिकेट

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा