सुरुवातीलाच गोल करून खाते उघडल्यानंतर मांडीचे स्नायू ताणले गेल्यामुळे रिअल माद्रिदचा अव्वल फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याला सामन्यातून माघार घ्यावी लागली. गॅरेथ बॅले याने केलेल्या गोलमुळे रिअल माद्रिदने अल्मेरियावर ५-० असा दणदणीत विजय मिळवला. मात्र स्पॅनिश लीगच्या गुणतालिकेत ते अव्वल स्थानी असलेल्या बार्सिलोनापेक्षा सहा गुणांनी मागे आहेत. बार्सिलोनाने लिओनेल मेस्सीच्या अनुपस्थितीतही ग्रेनडावर ४-० अशी सहज मात केली. गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या अ‍ॅटलेटिको माद्रिदने गेटाफेचा ७-० असा धुव्वा उडवला.
रोनाल्डोने तिसऱ्याच मिनिटाला इस्कोच्या क्रॉसवर गोल करीत रिअल माद्रिदचे खाते खोलले. मात्र दुसऱ्या सत्राचा खेळ सुरू झाल्यानंतर रोनाल्डोला दुखापतीचा त्रास जाणू लागल्याने त्याच्या जागी जेसे रॉड्रिग्जला संधी देण्यात आली. रोनाल्डो माघारी परतल्यानंतर रिअल माद्रिदने लागोपाठ चार गोलांची सरबत्ती केली. ६१व्या मिनिटाला करीम बेन्झेमाने दुसऱ्या गोलाची भर घातली. त्यानंतर सर्वाधिक पैसे मोजून विकत घेतलेल्या गॅरेथ बॅलेने ७१व्या मिनिटाला तिसरा गोल केला. इस्को आणि अल्वारो मोराटा यांनी प्रत्येकी एक गोल करीत रिअल माद्रिदच्या विजयावर मोहोर उमटवली.
बार्सिलोनाने १० जणांसह खेळणाऱ्या ग्रेनडावर विजय मिळवीत घरच्या मैदानावरील सर्व सामने जिंकण्याची करामत केली. पहिल्या सत्रात आंद्रेस इनियेस्टा आणि सेस्क फॅब्रेगस यांनी पेनल्टीवर गोल करीत बार्सिलोनाला २-० अशा आघाडीवर आणले. त्यानंतर अ‍ॅलेक्सिस सांचेझ आणि प्रेडो रॉड्रिगेझ यांनी गोल करीत बार्सिलोनाला विजय मिळवून दिला. अ‍ॅटलेटिको माद्रिदच्या विजयात राऊल गार्सिया आणि डेव्हिड व्हिला यांनी प्रत्येकी दोन गोल करीत मोलाची भूमिका बजावली.

Story img Loader