ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या दोन गोलच्या जोरावर रिअल माद्रिद संघाने ला लिगा स्पध्रेच्या बुधवारी खेळवण्यात आलेल्या लढतीत रिअल सोसिएदाद क्लबवर ३-१ असा विजय मिळवला. घरच्या प्रेक्षकांसमोर माद्रिदच्या या विजयाने टीकाकारांचे लक्ष्य बनलेल्या प्रशिक्षक राफेल बेनिटेज यांना दिलासा दिला. या विजयाबरोबरच माद्रिदने (३६) १ गुणांच्या आघाडीसह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. सातत्यपूर्ण कामगिरीच्या अभावामुळे माद्रिदचे प्रशिक्षक बेनिटेज यांच्या पदावर गदा येण्याची चिन्हे दिसू लागली होती़, परंतु माद्रिद पुन्हा विजय पथावर परतल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. पहिल्या सत्रात माद्रिदचे आक्रमक खेळ करताना सामन्यावर पकड घेण्याचा प्रयत्न केला, मात्र सोसिएदादकडून त्यांना तितकेच जबरदस्त प्रत्युत्तर मिळाले. ४२व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीवर रोनाल्डोने गोल करून संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात सोसिएदादच्या ब्रुमाने गोल करत सामना १-१ असा बरोबरीत आणला आणि लढतीतील रंजकता वाढवली. ६७व्या मिनिटाला रोनाल्डोने आणखी एक गोल नोंदवून माद्रिदला पुन्हा आघाडीवर आणले. २०१५च्या हंगामातील त्याला हा ५७वा गोल ठरला. लिओनेल मेस्सीला हा विक्रम मागे टाकण्यासाठी किमान सहा गोल करण्याची आवश्यकता आहे. ८६व्या मिनिटाला लुकास व्ॉझक्यूझने गोल करत माद्रिदच्या विजयावर ३-१ असे शिक्कामोर्तब केले.

Story img Loader