गुडघ्याच्या दुखापतीने हैराण
ख्रिस्तियानो रोनाल्डो म्हणजे पोर्तुगाल संघाचा आत्मा. गोल करण्याच्या अद्भुत क्षमतेमुळे रोनाल्डोच्या प्रदर्शनावरच पोर्तुगालची विश्वचषकातील आगेकूच अवलंबून आहे. मात्र हा कोहिनूर पोर्तुगालच्या बलाढय़ जर्मनीविरुद्धच्या लढतीत खेळणार का? याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. जर्मनीसारख्या मजबूत संघाचा सामना करण्यापूर्वी झालेल्या पोर्तुगालच्या सराव सत्रात रोनाल्डो सहभागी झाला, मात्र त्याच्या डाव्या गुडघ्याचे दुखणे बळावल्याने उपचारांसाठी त्याला मैदान सोडावे लागले.
राखाडी रंगाची जर्सी आणि काळ्या रंगाची शॉर्ट अशा पेहरावात अवतरलेल्या रोनाल्डोला पाहण्यासाठी तरुणींनी मोठय़ा प्रमाणावर गर्दी केली होती. प्रत्यक्ष सामन्यात चित्त्यासारखा पळणाऱ्या रोनाल्डोच्या यशाचे रहस्य काय, हे पाहण्यासाठी त्याचे चाहते पोर्तुगालच्या सराव शिबिराच्या ठिकाणी जमले होते. मात्र सरावाऐवजी वेदनांनी त्रस्त रोनाल्डोला पाहणे त्यांच्या नशिबी आले.
गुडघ्याला त्रास जाणवू लागल्याने रोनाल्डोने सराव सोडण्याचा निर्णय घेतला. त्याच्या डाव्या गुडघ्याला बर्फाची पिशवी बांधण्यात आली होती. एरवी आपल्या संघाला जिंकून देण्यासाठी जिवाचे रान करणारा रोनाल्डो साध्या दुखण्यासाठी सराव सोडून देणार नाही, याची चाहत्यांना खात्री आहे. यामुळेच रोनाल्डोचे दुखणे गंभीर नसल्याचे प्रशिक्षक आणि सहकारी सांगत असले तरी चाहत्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकत आहे. विश्वचषकापूर्वी आयोजित मैत्रीपूर्ण लढतींमध्येही रोनाल्डोला याच दुखण्यामुळे खेळता आले नव्हते. स्पर्धेतील लक्षवेधी खेळाडूंपैकी एक असलेला रोनाल्डो खेळू शकला नाही तर त्याच्या आणि पोर्तुगालच्या चाहत्यांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे.

‘‘तो शंभर टक्के तंदुरुस्त आहे. सर्वकाही ठीक आहे. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून त्याच्या गुडघ्याला बर्फाच्या पिशवी बांधण्यात आले होते. अन्य खेळाडूंच्या गुडघ्यांना जपण्यासाठीही ही उपाययोजना करण्यात आली आहे. काळजी करण्यासारखे काहीच नाही.’’
जोओ मॉटिन्हो

Story img Loader