ख्रिस्तियानो रोनाल्डोने हॅट्ट्रिक नोंदवत रिअल माद्रिद संघाला सेव्हिल्लावर ३-२ असा विजय मिळवून देत संघाच्या ला लिगा जेतेपदाच्या आशा कायम राखल्या आहेत. माद्रिदचा हा सेव्हिल्लाविरुद्ध सलग ३४वा विजय आहे. तत्पूर्वी, बार्सिलोनाने लुइस सुआरेझच्या हॅट्ट्रिकच्या जोरावर कोडरेबा संघाचा ८-० असा धुव्वा उडवला. माद्रिद आणि बार्सिलोना यांच्यात आता केवळ दोन गुणांचे अंतर असून दोन्ही संघांच्या प्रत्येकी तीन लढती शिल्लक आहेत.
माद्रिद आणि सेव्हिल्ला यांच्यात कडवी झुंज पाहायला मिळाली. सामन्याच्या सुरुवातीच्या मिनिटाला सेव्हिल्लाचा गोलरक्षक सेर्जिओ रिकोने अप्रतिम क्षेत्ररक्षण करताना रोनाल्डोला पहिला गोल करण्यापासून रोखले. मात्र, ३६व्या मिनिटाला रोनाल्डोने पलटवार करत माद्रिदसाठी पहिला गोल नोंदवला. एका मिनिटाच्या आत पुन्हा रोनाल्डोने सॅव्हिल्लाची बचावफळी भेदून दुसरा गोल केला. ४५व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीचे रूपांतर गोलमध्ये करून कार्लोस बाक्काने सॅव्हिल्लासाठी पहिला गोल केला. मध्यंतरापर्यंत सामना २-१ असा माद्रिदच्या बाजूने होता. ६८व्या मिनिटाला रोनाल्डोने गोल करून ही आघाडी ३-१ अशी वाढवली, परंतु दहा मिनिटांच्या आत सॅव्हिल्लाकडून पलटवार झाला. बदली खेळाडू म्हणून आलेल्या इबोराने गोल करून सॅव्हिल्लाचे पुनरागमन केले. मात्र, माद्रिदने अगदी चतुराईने खेळ करत सामना ३-२ असा आपल्या बाजूने झुकवला.
बार्सिलोनाचे वर्चस्व!
लिओनेल मेस्सी, लुइस सुआरेझ आणि नेयमार या शतकपूर्ती त्रिकुटाने आपला झंझावाती खेळ कायम राखत बार्सिलोनाला कोडरेबा संघावर ८-० असा दणदणीत विजय मिळवून दिला. ४२व्या मिनिटाला मेस्सीच्या पासवर रॅकीटीकने गोल करून बार्सिलोनाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर सुआरेझ (४५ मि., ५३ मि. व ८८ मि.), मेस्सी (४६ मि. व ८० मि.), पिक्युई (६५ मि.) व नेयमार (८५ मि.) यांनी गोल करत बार्सिलोनाचा ८-० असा विजय निश्चित केला.