ख्रिस्तियानो रोनाल्डोला मिळालेल्या पेनल्टीवर गोल करण्यात अपयश आल्यामुळे रिअल माद्रिद संघावर ‘ला लिगा’ फुटबॉल स्पध्रेच्या जेतेपदाच्या शर्यतीतून बाद होण्याची नामुष्की ओढावली आहे. रविवारी झालेल्या सामन्यात रोनाल्डोच्या या अपयशामुळे माद्रिदला घरच्या मैदानावर वेलेन्सीआ संघाविरुद्ध २-२ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले. माद्रिदच्या या बरोबरीमुळे बार्सिलोना संघाची जेतेपदाची दावेदारी आणखी भक्कम झाली आहे.
माद्रिद आणि वेलेन्सीआ यांच्यातील लढतीत पहिल्या सत्रामध्ये वेलेन्सीआने वर्चस्व गाजवले. १९व्या मिनिटाला पॅको अ‍ॅल्कासरने जोस गयाच्या पासवर गोल करून पाहुण्यांना १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर अवघ्या ७ मिनिटांच्या आत वेलेन्सीआसाठी झावी फुएगोने गोल करून ही आघाडी २-० अशी भक्कम केली. पहिले सत्र संपायला अवघे काही सेकंद शिल्लक असताना माद्रिदला पेनल्टी किक मिळाली. माद्रिदचे खाते उघडण्यासाठी त्यांचा सर्वात यशस्वी खेळाडू रोनाल्डो पुढे सरसावला आणि त्याने चेंडू डाव्या बाजूने गोलजाळीच्या दिशेने भिरकावला. मात्र, वेलेन्सीआचा गोलरक्षक डिएगो अ‍ॅल्वेस याने चपळाईने तो चेंडू अडवला आणि मध्यंतरापर्यंत माद्रिदची पाटी कोरीच ठेवली. रोनाल्डोचा हा चुकलेला गोल माद्रिदला पुढे खूप महागात पडला. दुसऱ्या सत्रात माद्रिदकडून गोल करण्याचे अनेक प्रयत्न झाले. ५५व्या मिनिटाला अ‍ॅल्वेसकडून पुन्हा एक अप्रतिम बचाव झाला. मात्र, पुढच्याच मिनिटाला जेम्स रॉड्रीग्ज्ने कॉर्नरवरून टोलावलेल्या चेंडूवर पेपेने हेडरद्वारे माद्रिदला पहिला गोल करून दिला. या गोलमुळे माद्रिदच्या चमूत हुरहुरी आली आणि ८४व्या मिनिटाला इस्कोने गोल करून सामना २-२ असा बरोबरीत सोडवण्यात यश मिळवले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बार्सिलोना जेतेपदाच्या उंबरठय़ावर
बार्सिलोनाने रविवारच्या लढतीत रिअल सोसिदाद संघावर २-० असा सोपा विजय मिळवून चार गुणांची भक्कम आघाडी घेतली आहे. बार्सिलोनासाठी ५१व्या मिनिटाला नेयमारने पहिला गोल केला आणि ८५व्या मिनिटाला प्रेडोने त्यात भर टाकून २-० असा विजय निश्चित केला. त्यांना २३ व्यांदा ला लिगाचे जेतेपद पटकावण्यासाठी एक विजय हवा आहे. बार्सिलोनाची पुढची लढत गतविजेत्या अ‍ॅटलेटिको माद्रिद संघाशी आहे.  

अजूनही दोन सामने शिल्लक आहेत आणि आम्हाला ते जिंकायलाच हवे, परंतु या विजयानंतरही स्पध्रेचे जेतेपद मिळेल, याची शाश्वती नाही. निकालावर नाखूश आहे. आम्हाला गोल करण्याच्या अनेक संधी मिळाल्या. तीन वेळा चेंडू गोलपोस्टवर आदळला, एक पेनल्टी हुकली.
– कार्लो अँसेलोट्टी, रिअल माद्रिद संघाचे प्रशिक्षक

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ronaldo misses penalty as real madrid draw gives barcelona title edge