गोलरक्षक आयकर कसिल्लास याने सामन्यातून माघार घेतल्यानंतर १० जणांसह खेळणाऱ्या रिअल माद्रिदसाठी ख्रिस्तियानो रोनाल्डो तारणहार ठरला. रोनाल्डोने केलेल्या दोन गोलांच्या बळावर स्पॅनिश लीग फुटबॉल स्पर्धेत रिअल माद्रिदने रिअल सोसिएदादचे आव्हान ४-३ असे परतवून लावले. बार्सिलोनाने इस्पान्योलवर ४-० असा दणदणीत विजय मिळवत गुणतालिकेत अव्वल स्थान कायम राखले आहे.
पहिल्या सत्रात चारही गोल करणाऱ्या बार्सिलोनाने १८ सामन्यांत ५२ गुणांसह अव्वलस्थानी झेप घेतली आहे. दुसऱ्या क्रमांकावरील अॅटलेटिको माद्रिद (४१ गुण) आणि कट्टर प्रतिस्पर्धी रिअल माद्रिद (३६ गुण) यांच्यापेक्षा बार्सिलोना संघ अनुक्रमे १२ आणि १६ गुणांनी आघाडीवर आहे. रिअल माद्रिदचा कर्णधार कसिल्लास सलग दुसऱ्या सामन्यात माघारी परतला. पण पाच मिनिटानंतर अडान गॅरिडो याला लाल कार्ड दाखवण्यात आल्यानंतर कसिल्लासला पुन्हा मैदानावर परतावे लागले.
दुसऱ्या मिनिटाला करीम बेन्झेमाने रिअल माद्रिदचे खाते खोलले. पण नवव्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी-किकवर झाबी प्रिएटो याने सोसिएदादसाठी पहिला गोल करून सामन्यात बरोबरी साधली. ३५व्या मिनिटाला सामी खेदिरा याने पुन्हा माद्रिदला आघाडीवर आणले. पण पहिल्या सत्राचा खेळ संपण्यास काही मिनिटे शिल्लक असताना झाबी याने दुसरा गोल करून सामन्यात रंगत आणली.
दुसऱ्या सत्रात माद्रिदने गोल करण्याच बरेच प्रयत्न केले. अखेर ६८व्या आणि ७०व्या मिनिटाला रोनाल्डोने दोन गोलांची भर घालत रिअल माद्रिदला ४-२ अशा आघाडीवर आणले. ७६व्या मिनिटाला झाबीने तिसरा गोल झळकावून हॅट्ट्रिक साजरी केली. त्यानंतर सोसिएदादच्या डॅनियल इस्राडा याला पंचांनी दुसरे पिवळे कार्ड दाखवल्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले. त्यानंतर बरोबरी साधण्यात रिअल सोसिएदादला अपयश आले.
माद्रिदच्या मदतीला रोनाल्डो धावला
गोलरक्षक आयकर कसिल्लास याने सामन्यातून माघार घेतल्यानंतर १० जणांसह खेळणाऱ्या रिअल माद्रिदसाठी ख्रिस्तियानो रोनाल्डो तारणहार ठरला. रोनाल्डोने केलेल्या दोन गोलांच्या बळावर स्पॅनिश लीग फुटबॉल स्पर्धेत रिअल माद्रिदने रिअल सोसिएदादचे आव्हान ४-३ असे परतवून लावले.
First published on: 08-01-2013 at 02:48 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ronaldo rescues madrid barca cruise to victory