ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या पाच गोलांच्या जोरावर रिअल माद्रिदने ला लिगा फुटबॉल स्पर्धेत ग्रॅनडाचा धुव्वा उडवला. रिअलने ही लढत ९-१ अशा प्रचंड फरकाने जिंकली. या विजयामुळे गुणतालिकेत रिअलने दमदार आगेकूच केली असून, बार्सिलोनापासून केवळ एका गुणाने मागे आहेत.
सुरेख फॉर्ममध्ये असलेल्या गॅरेथ बॅलेने २५व्या मिनिटाला सलामीचा गोल करत रिअल माद्रिदचे खाते उघडले. यानंतर रोनाल्डोने एकामागोमाग गोलचा सपाटाच लावला. मध्यंतरानंतर आठ मिनिटांत रोनाल्डोने तीन गोल केले. रिअलचा अनुभवी खेळाडू करिम बेन्झेमाने ५२व्या आणि ५६व्या मिनिटाला गोल करत रिअलच्या मोठय़ा विजयावर शिक्कामोर्तब केले. ग्रॅनडातर्फे रॉबर्ट इबानेझने एकमेव गोल केला. दिएगो मेन्झने स्वयंगोल केला.
रोनाल्डाने सहकाऱ्यांकडून मिळणाऱ्या पासेसचा अचूक उपयोग करून घेत जोरदार हल्लाबोल केला. रोनाल्डोच्या आक्रमणापुढे ग्रॅनडाचा बचाव निष्प्रभ ठरला. रोनाल्डोच्या सर्वागीण वावरासह रिअलने संपूर्ण सामन्यात चेंडूवर नियंत्रण राखत वर्चस्व गाजवले. यंदाच्या हंगामात रिअल माद्रिदच्या कामगिरीत सातत्याचा अभाव आहे. शेवटच्या चार सामन्यात रिअलला एकच विजय मिळवता आला आहे. मात्र या विजयासह रिअलने जोरदार मुसंडी मारली आहे. जगातील सवरेत्कृष्ट खेळाडूचा पुरस्काराचा मानकरी असलेल्या रोनाल्डोने आपले कर्तृत्व सिद्ध करत विजयात निर्णायक भूमिका बजावली.
अॅटलेटिको संघ विजयी
अॅटलेटिको माद्रिदने कोरडोबा संघावर २-० असा सहज विजय मिळवत गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. अँटोइन ग्रिइझमन आणि सौल निग्युेझ यांनी प्रत्येकी गोल केला.