एकेकाळचा मँचेस्टर युनायटेडचा खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो आता युनायटेडसाठीच डोकेदुखी ठरला आहे. रोनाल्डोने केलेल्या निर्णायक गोलमुळे रिअल माद्रिदने मँचेस्टर युनायटेडचा २-१ असा पराभव करून चॅम्पियन्स लीगच्या उपांत्यपूर्व फेरीत मजल मारली आहे. या पराभवामुळे मँचेस्टर युनायटेडचे आव्हान मात्र संपुष्टात आले आहे.
अंतिम १६ जणांच्या दुसऱ्या टप्प्यातील या सामन्यात रिअल माद्रिदच्या सर्जिओ रामोसने स्वत:च गोलजाळ्यात चेंडू ढकलत मँचेस्टर युनायटेडला आघाडीवर आणले. पण ५६व्या मिनिटाला नानीने अल्वारो अर्बेलोआ याला धक्काबुक्की केल्याप्रकरणी पंचांनी लाल कार्ड दाखविल्यामुळे युनायटेडला उर्वरित सामन्यात १० जणांसह खेळावे लागले. याचाच फायदा उठवत रिअल माद्रिदने चार मिनिटांच्या अंतराने दोन गोल करत पुढील फेरीत आगेकूच केली.
ल्युका मॉड्रिच याने ६६व्या मिनिटाला रिअल माद्रिदला बरोबरी साधून दिली. त्यानंतर तीन मिनिटांनी रोनाल्डो याने रिअल माद्रिदसाठी दुसरा आणि सामन्यातील निर्णायक गोल झळकावला. ‘‘नानीला लाल कार्ड दाखविल्यामुळे युनायटेडसारख्या तुल्यबळ संघाला पराभव पत्करावा लागला. या विजयासाठी आम्ही योग्य नव्हतो, पण फुटबॉलमध्ये असे घडते,’’ असे रिअल माद्रिदचे प्रशिक्षक जोस मॉरिन्हो यांनी सांगितले.
अन्य सामन्यात बोरुसिया डॉर्टमंड संघाने शख्तार डोनेत्सकचा ३-० असा धुव्वा उडवत उपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान निश्चित केले. बोरुसिया डॉर्टमंड संघाकडून फेलिपे सान्ताना (३१व्या मिनिटाला), मारियो गोट्झे (३७व्या मिनिटाला), जाकूब ब्लास्झीकोव्हस्की (५९व्या मिनिटाला) यांनी गोल केले. या दोन्ही संघांमधील पहिल्या टप्प्यातील सामना २-२ असा बरोबरीत सुटला होता.

Story img Loader