यू मुंबाचे मालक आणि चित्रपट निर्माते रॉनी स्क्रूवाला यांचा संकल्प
जगभरात खेळ आणि खेळाडूंवर चित्रपट आले. त्यांना प्रेक्षकांनीही चांगला प्रतिसाद दिला. सध्याच्या घडीला भारतामध्ये क्रिकेटनंतर कबड्डी या खेळाला प्रसिद्धी आणि ग्लॅमर मिळताना दिसत आहे. कबड्डीतील मध्यमवर्गातील खेळाडू आता अनेकांच्या गळ्यातील ताईत बनत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या मातीत रुजलेल्या कबड्डीवर चित्रपट काढण्याचा विचार प्रो कबड्डीतील यू मुंबा संघाचे मालक आणि सिने निर्माता रॉनी स्क्रूवाला यांनी बोलून दाखवला होता. कबड्डीपटूच्या जीवनातील संघर्ष या चित्रपटात मांडणार असल्याचा निर्धार स्क्रूवाला यांनी खास ‘लोकसत्ता’कडे व्यक्त केला.
कबड्डीवर सिनेमा बनवण्याची प्रेरणा कुठून मिळाली, याबाबत ते म्हणाले की, ‘‘गेल्या दोन वर्षांपासून मी प्रो कबड्डीशी जोडला गेलो आहे. त्यामुळे मला खेळाडूंच्या संघर्षांच्या बऱ्याच कथा जवळून पाहायला मिळाल्या. काही वेळेला त्यांना कशी वागणूक दिली जायची, हे सारे मी ऐकत आलो. प्रत्येक खेळाडूच्या जीवनप्रवासामध्ये अजूनही एक कहाणी दडलेली आहे. त्याच गोष्टीने मला सिनेमा काढण्यासाठी प्रेरणा मिळाली.’’
चांगला चित्रपट बहुतांशी वेळा सहजपणे बनत नाही. त्यामध्ये काही तरी विचार, अभ्यास असतो. त्यासाठी एक प्रक्रिया असते. या चित्रपटाबाबत ते म्हणाले की, ‘‘गेल्या सात वर्षांपासून आनंद महिंद्रा आणि चारु शर्मा यांच्याबरोबर मी कबड्डीसाठी एकत्र आलो. त्यावर चर्चा करायला लागलो. विचांराची देवाण-घेवाण झाली. तेव्हापासून कुठे तरी या चित्रपटाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. सात वर्षांपूर्वी त्यांनी प्रो कबड्डी लीग बनवण्याचे स्वप्न पाहिले होते आणि ते दोन वर्षांपूर्वी सत्यात उतरले आणि चित्रपट बनवण्याचा माझा विचार पक्का होत गेला.’’
या चित्रपटमध्ये काय असेल याची उत्सुकता साऱ्यांनाच आहे, याबाबत ते म्हणाले की, ‘‘या सिनेमाची गोष्ट फक्त खेळाडूंचीच असेल किंवा फक्त खेळाचीच असेल असे नाही. माझ्या संघातील किंवा अन्य कोणत्याही संघातील खेळाडूंच्या संघर्षांची चित्रपटात गोष्ट असेल. त्याचबरोबर देशाला या खेळाडूंबद्दल आणि खेळाडूंना देशाबद्दल वाटणारा अभिमान, याचाही यामध्ये समावेश असेल. माझ्या मते या साऱ्या गोष्टींची गुंफण सिनेमामध्ये दाखवायची आहे.’’
गेल्या दोन वर्षांमध्ये तुम्हाला प्रो कबड्डीमधून नेमके काय दिले, हे विचारल्यावर स्क्रूवाला म्हणाले की, ‘‘संघ आणि खेळभावना या दोन गोष्टी प्रकर्षांने मला मिळाल्या. खेळाडू संघासाठी खेळत असताना नेहमीच जिंकण्यासाठी खेळत असतो. प्रतिस्पर्धी संघात त्याचा कितीही चांगला मित्र असला तरी त्याचा विचार तो करत नाही. खेळाच्या वेळेला फक्त खेळाचाच विचार तो करत असतो. पण सामना संपल्यावर मात्र त्यांच्यामधली मैत्री पाहायला मिळते. माझ्यासाठी ही गोष्ट फार कौतुकास्पद आहे.’’
संघभावना हेच यशाचे रहस्य
प्रो कबड्डीचा हंगाम ज्या वळणावर येऊन ठेपला आहे, ते पाहता त्यांचा खेळ उंचावतो आहे. गतविजेत्याला साजेसा त्यांचा खेळ होत आहे. आमचा बचाव उत्तम आहे, त्याचबरोबर चढाईमध्येही चांगला खेळ होत आहे. आमच्या प्रशिक्षकांना दांडगा अनुभव आहे आणि त्याचबरोबर कर्णधार शांत वृत्तीचा आहे. या साऱ्या मिश्रणामुळे आमचा खेळ बहारदार होतो आहे. संघभावना हे आतापर्यंतच्या यशाचे रहस्य आहे.
‘सॅग’मुळे राखीव खेळाडूंना संधी मिळाली
संघातील काही खेळाडू दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये (सॅग) खेळायला गेले होते, त्याचाही संघाला फायदा झाला. संघातील चार खेळाडू तिथे खेळायला गेल्यामुळे राखीव खेळाडूंना आपली गुणवत्ता दाखवण्याची संधी मिळाली. राखीव खेळाडूंनीही या संधीचा फायदा घेत चांगली कामगिरी केली. या काळात संघाच्या कामगिरीमध्येही सातत्य पाहायला मिळाले.