अमेरिकेच्या फ्लॉईड मेवेदर याने जागतिक बॉक्सिंग महासंघाच्या लाइट मिडलवेट गटात सॉल अल्वारेझ याच्यावर सफाईदार विजय मिळवत व्यावसायिक गटात सलग ४५ लढतींमध्ये अपराजित्व राखले.
एकतर्फी झालेल्या लढतीत मेवेदरने सुरुवातीपासून आक्रमक चाली करीत वर्चस्व राखले होते. त्याने ही लढत ११४-११४, ११६-१११, ११७-१११ अशा फरकाने जिंकली. त्याने या विजयासह ४५ दशलक्ष डॉलर्सची कमाई केली. जागतिक स्पर्धेत पाच वेळा अजिंक्यपद मिळविणाऱ्या मेवेदरने या लढतीनंतर सांगितले, ‘‘ही लढत जिंकण्याची मला खात्री होती. चांगले कौशल्य हेच माझ्या यशाचे रहस्य आहे. माझे वडीलच प्रशिक्षक असल्यामुळे वेळोवेळी त्यांनी दिलेल्या सूचनांचे मी पालन केले. त्यांनी या लढतीसाठी व्यूहरचना ठरविली होती व त्यानुसारच मी खेळलो.’’ आतापर्यंत जागतिक महासंघाच्या ४३ लढती जिंकणाऱ्या अल्वारेझला येथे अपेक्षेइतका सूर गवसला नाही. अनेक चाहत्यांना त्याच्याकडून चिवट झुंजीची अपेक्षा होती. मात्र दडपणाखाली तो आपले कौशल्य दाखवू शकला नाही. लढतीमधील बराच वेळ त्याला बचावात्मक पवित्राच घ्यावा लागला होता. मेवेदर याने याआधी अमेरिकेच्याच रॉबर्ट गुरेरो याच्यावर मात केली होती. त्या वेळी त्या लढतीद्वारे त्याला २७ दशलक्ष डॉलर्सची कमाई झाली होती.