क्रीडा संघटनांचे राजकारण आणि त्यावरील पदाधिकाऱ्यांची अडेल भूमिका यामुळे एखाद्या खेळाबद्दलची उत्कंठा कशी ऱ्हास पावते, याचा अनुभव सध्या मुंबईतील शरीरसौष्ठव खेळाच्या चाहत्यांना येतो आहे. आर्थिक लाभ, राजकारण, हेवेदावे आणि मिरवण्याच्या खुमखुमीमुळे शरीरसौष्ठव खेळाच्या तीन संघटना मुंबईत कार्यरत असून या सर्वानीच ‘मुंबई-श्री’ची फॅक्टरीच उघडल्याचे निदर्शनास येते. गेल्या महिन्याभरात बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटना आणि मुंबई शरीरसौष्ठव संघटनेच्या ‘मुंबई-श्री’ स्पर्धा पार पाडल्या असतानाच मुंबई शरीरसौष्ठव आणि फिटनेस संघटनेची ‘मुंबई-श्री’ स्पर्धा येत्या रविवारी होत आहे. त्यामुळे या तिन्ही स्पर्धातील विजेत्यांपैकी नेमका मुंबई श्री कोण असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे.
भारतीय शरीरसौष्ठव महासंघाला क्रीडा मंत्रालयाने मान्यता दिल्यावर बऱ्याच राज्यांमध्ये संघटनांचे विलीनीकरण करण्यात आले आहे. पण मुंबईत मात्र महासंघ संघटनांचे विलीनीकरण करण्यात अयशस्वी ठरला आहे. काही महिन्यांपूर्वी महासंघाने सर्वाना एका व्यासपीठावर आणून विलीनीकरणाचा प्रयत्न केला होता, पण आर्थिक लाभांच्या आमिषामध्ये गुंतलेल्या संघटकांनी मात्र हा प्रस्ताव नाकारला आणि आपली ‘फॅक्टरी’ सुरूच ठेवली. संघटकांच्या या आडमुठी धोरणांमुळे खेळाडूंचे आणि चाहत्यांपुढे पेच पडला आहे. कोणाच्या संघटनेत खेळावे, हा खेळाडूंपुढे प्रश्न असून नेमका ‘मुंबई-श्री’ कोण या संभ्रमात चाहते पडले आहेत. संघटक जर एकत्र आले नाहीत, तर या खेळाकडे खेळाडू कमी वळतील आणि प्रेक्षकही पाठ फिरवण्याची शक्यता आहे.
तिन्ही संघटनांवर शिवसेनेचे वर्चस्व; मग विलीनीकरण करून कधी दाखवणार?
मुंबईतल्या या तिन्ही संघटना वेगळ्या दिसत असल्या तरी त्यामध्ये शिवसेनेचे वर्चस्व असल्याचे जाणवते. मुंबई शरीरसौष्ठव संघटनेचे पालकत्व स्वीकारलेले गजानन कीर्तिकर हे शिवसेनेचे नेते आहेत; तर मुंबई शरीरसौष्ठव आणि फिटनेस संघटनेची स्पर्धा युवा सेनेने आयोजित केली आहे, त्याचबरोबर बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटनेतही शिवसेनेचा सहभाग आहे. शिवसेनेच्या पुढाकारानेच त्यांची स्पर्धा वर्सोव्यामध्ये पार पडली होती. त्यामुळे जर सर्व संघटनांनी एकत्र यायचे असेल तर शिवसेनेच्या मंडळींना पुढाकार घ्यायला हवा. खेळाच्या विकासासाठी शिवसेनेची मंडळी हे विलीनीकरण करून दाखवतात का, याकडेच मुंबईकरांचे लक्ष असेल.