इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेतील ‘अस्सल झुंज’ शनिवारी क्रिकेटरसिकांना पाहायला मिळणार आहे. गुणतालिकेतील अव्वल स्थानासाठीच्या या रंगतदार लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ राजस्थान रॉयल्सशी भिडणार आहे.
यंदाच्या हंगामात बंगळुरूच्या संघाने घरच्या मैदानावरील चार सामने जिंकण्याची कर्तबगारी दाखवली असली तरी आता गाठ राजस्थानशी आहे. बुधवारी मुंबई इंडियन्सला हरविण्याची किमया साधणाऱ्या राजस्थान रॉयल्सच्या खात्यावर पाच सामन्यांतील चार विजय जमा आहेत. दुबळ्या पुणे वॉरियर्सकडून पत्करलेला आश्चर्यकारक पराभव सोडल्यास राजस्थानने गतविजेत्या कोलकाता नाइट रायडर्सलाही पराभूत करण्याचा पराक्रम दाखवला आहे.
जयपूरस्थित राजस्थान संघाचे नेतृत्व राहुल द्रविड जरी सांभाळत असला तरी तो मूळचा बंगळुरवासी. शनिवारचा सामना राजस्थानने जिंकल्यास ते गुणतालिकेत निर्विवाद आघाडीचे स्थान मिळवतील. सध्या हे दोन्ही प्रतिस्पर्धी संघ आठ गुणांवर आहेत. आयपीएलच्या पहिल्यावहिल्या हंगामाचे जेतेपद काबीज करणाऱ्या राजस्थान रॉयल्सने बुधवारी बलाढय़ मुंबई इंडियन्सचा ८६ धावांनी पराभव केला. विजयाची हीच घोडदौड कायम राखण्याचा त्यांचा मानस आहे.
गुणवत्ता आणि कामगिरी दाखवू शकणारे भारतीय खेळाडू राजस्थानकडे आहेत. अजिंक्य रहाणे, द्रविड, एस. श्रीशांत आणि सिद्धार्थ त्रिवेदी यांना चांगले यश मिळत आहे. परंतु ख्रिस गेल, विराट कोहली आणि ए बी डी’व्हिलियर्स हे बंगळुरूचे धडाकेबाज फलंदाज बेफाम फॉर्मात आहेत. त्यामुळे श्रीशांत, त्रिवेदी आणि केव्हिन कूपर या राजस्थानी गोलंदाजांची कसोटी लागणार आहे.
डोके शांत ठेवून आक्रमक फलंदाजी करणारा गेल आणि अशांत माथ्याने वेगवान गोलंदाजी करणाऱ्या श्रीशांत यांच्यातील मैदानावरील लढत शनिवारी एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर क्रिकेटरसिकांना पाहायला मिळेल. ‘थप्पड’ प्रकरणी वादग्रस्त विधाने ट्विटरवर केल्यानंतर श्रीशांत प्रथमच मैदानावर दिसू शकेल.
बंगळुरूच्या फलंदाजीची धुरा जशी प्रतिस्पर्धी गोलंदाजांचा कर्दनकाळ गेलवर असेल, तशीच डी’व्हिलियर्स आणि कोहलीवरसुद्धा असेल. गेलचा सलामीचा साथीदार अजूनही बंगळुरूला सापडलेला नाही.
वेस्ट इंडिजच्या या स्फोटक फलंदाजासोबत मयांक अगरवाल आणि लोकेश राहुल यांनी सलामीला उतरून पाहिले. पण ते अपयशी ठरले. बंगळुरूचा संघ व्यवस्थापन श्रीलंकेच्या तिलकरत्ने दिलशानला गेलसोबत सलामीला पाठविण्याची शक्यता आहे.
बंगळुरूच्या संघाची सांघिक ताकदसुद्धा मैदानावर प्रत्ययास आली आहे. ऑफ-स्पिनर मुथय्या मुरलीधरनसुद्धा शनिवारी खेळल्यास प्रतिस्पर्धी फलंदाजांची अग्निपरीक्षा ठरेल.
द्रविडसुद्धा आपल्या संघासोबत अनेक प्रयोग करीत आहे. ८ एप्रिलला जयपूर येथे कोलकाताविरुद्धच्या सामन्यात द्रविडने चक्क पाच गोलंदाजांना संघात स्थान दिले होते.
सामन्याची वेळ : रात्री ८ वा.पासून
अस्सल झुंज!
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेतील ‘अस्सल झुंज’ शनिवारी क्रिकेटरसिकांना पाहायला मिळणार आहे. गुणतालिकेतील अव्वल स्थानासाठीच्या या रंगतदार लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ राजस्थान रॉयल्सशी भिडणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 20-04-2013 at 04:15 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Royal challanger bangaluru will play against rajastan royal