मायदेशात आल्यावर आपल्या घरच्या मैदानात पहिलावहिला विजय मिळवून मुंबई इंडियन्सने पराभवाचा दुबळेपणा झटकून टाकत विजयाचा श्रीगणेशा केला आणि स्पर्धेतील आव्हान कायम ठेवले. आता प्रत्येक सामन्यामध्ये त्यांना हेच विजयाचे पाऊल अधिक भक्कमपणे टाकावे लागणार आहे. अशी एकापुढे एक विजयाची पावले ते टाकत गेले तरच त्यांना बाद फेरीच्या दिशेने कूच करता येईल. मंगळवारी वानखेडेवर मुंबईचा सामना होणार आहे तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी. गेल्या मोसमात वानखेडेवर मुंबईने एकही सामना गमावला नव्हता. या सामन्यात त्यांना याच कामगिरीची पुनरावृत्ती करता येईल का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
पंजाबविरुद्धच्या सामन्यात मुंबईने मिळवलेला विजय हा सांघिक होता. गोलंदाजीमध्ये मुंबईला जास्त चमक दाखवता आली नव्हती, पण कोरे अँडरसनने अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. फलंदाजीमध्ये अँडरसनसह सी.एम. गौतम, कर्णधार रोहित शर्मा, किरॉन पोलार्ड आणि आदित्य तरे यांनी दमदार फलंदाजी केली होती, पण यांच्यापैकी पोलार्डचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी साकारता आलेली नाही आणि हीच संघासाठी चिंतेची बाब ठरू शकते.
दुसरीकडे बंगळुरूचा संघही विजयासाठी आसुसलेला आहे. सलग तीन सामने गमावल्यावर बंगळुरूने हैदराबादवर विजय मिळवला असून तेही विजयाच्या वाटेवर परतले आहेत. ख्रिस गेल, विराट कोहली, युवराज सिंग आणि ए बी डी’व्हिलियर्स हे क्रिकेटजगतात नावाजलेले फलंदाज बंगळुरूच्या ताफ्यात असून त्यांच्यावरच फलंदाजीची मदार असेल. गेल्या काही सामन्यांमध्ये कोहली आणि युवराज हे फॉर्मात दिसलेले नाहीत, हीच संघासाठी चिंतेची बाब असेल. गोलंदाजीमध्ये वरुण आरोन, मिचेल स्टार्क आणि युजवेंद्र चहल यांनी आतापर्यंत चांगली कामगिरी केली असून त्यांच्याकडून सातत्यपूर्ण कामगिरीची अपेक्षा असेल. युजवेंद्रला पहिल्यांदाच मुंबईचे फलंदाज कसे सामोरे जातात, याची उत्सुकता असेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा