ट्वेन्टी-२०च्या ‘रन’भूमीवर ग्लेन मॅक्सवेल श्रेष्ठ की ख्रिस गेल?.. या प्रश्नाचे उत्तर शुक्रवारी होणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यातील लढतीद्वारे मिळणार आहे.
गेली अनेक वष्रे गेलच्या वादळी फटकेबाजीचे आयपीएलवर वर्चस्व आहे. आयपीएलच्या सातव्या मोसमात मॅक्सवेलनेही धावांचा पाऊस पाडत किंग्ज इलेव्हन पंजाबला ‘न भूतो, न भविष्यती’ असे यश मिळवून दिले आहे.
मॅक्सवेल बुधवारी चौथ्यांदा शतकापासून वंचित राहिला. परंतु किंग्ज इलेव्हन पंजाबने शानदार विजयासह गुणतालिकेत मात्र अव्वल स्थान पटकावले. ‘नव्‍‌र्हस नाइन्टी’च्या (निराशामय नव्वदी) फेऱ्यावर मात करण्याचे आव्हान मॅक्सवेलपुढे असणार आहे. पंजाब आणि बंगळुरू या दोन्ही संघांमध्ये एकापेक्षा एक धडाकेबाज फलंदाज मौजूद असल्यामुळे या लढतीमध्ये वेगळी रंगत पाहायला मिळेल. पंजाबकडे वीरेंद्र सेहवाग, डेव्हिड मिलर आणि जॉर्ज बेली आहेत, तर बंगळुरूकडे गेल, विराट कोहली आणि ए बी डी’व्हिलियर्ससारखे दिग्गज फलंदाज आहेत.
वानखेडेवर मुंबई इंडियन्सकडून हार पत्करल्यानंतर आता घरच्या मैदानाचा फायदा उठवून पंजाबला हरवण्याचे ध्येय बंगळुरूसमोर आहे.
सात सामन्यांपैकी तीन विजय आणि चार पराजयांसह ६ गुणांवर असलेला बंगळुरूचा संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. पहिल्या चार सामन्यांनंतर दुखापतग्रस्त गेल बंगळुरूला उपलब्ध झाला आहे. कोहली आपल्या नेहमीच्या फॉर्मात आहे. परंतु यंदाच्या लिलावात १४ कोटी रुपयांची बोली जिंकणारा युवराज सिंग अद्याप आपल्या दर्जाला साजेसा खेळ दाखवू शकलेला नाही.

Story img Loader