विराट कोहली, ख्रिस गेल, ए.बी. डी‘व्हिलियर्स आणि शेन वॉटसन ही मातब्बर मंडळी संघात असतानाही रॉयल चॅलेंजर बंगळुरू संघासमोर इंडियन प्रीमिअर लीगमध्ये आव्हान टिकवण्यासाठी धडपड करावी लागत आहे. शनिवारी त्यांना गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या गुजरात लायन्स संघाशी सामना करावा लागणार असून या सामन्यातील निकालावर त्यांचे स्पध्रेतील भवितव्य अवलंबून आहे.
दहा सामन्यांत चार विजय मिळवीत ८ गुणांसह बंगळुरू सहाव्या स्थानावर आहे आणि त्यांना उर्वरित चारही सामने जिंकणे अनिवार्य आहे. घरच्या मैदानावर झालेल्या लढतीत त्यांना मुंबई इंडियन्सने दारुण पराभूत केले होते. या पराभव विसरून पुन्हा नव्या जोमाने मैदानात उतरण्याचे आव्हान बंगळुरूला पेलावे लागणार आहे. आयपीएलच्या या हंगामात विराट कोहलीने दोन शतके आणि चार अर्धशतकांसह सर्वाधिक ५६८ धावा चोपल्या आहेत, तर ४०९ धावा करणारा डी’व्हिलियर्स संघातील दुसरा क्रमांकाचा फलंदाज आहे. लोकेश राहुलने फलंदाजीत आपली छाप सोडत असला तरी यष्टीमागे त्याने केलेल्या चुका संघाला महागात पडल्या आहेत. वॉटसनने अष्टपैलू कामगिरी करून स्वत:चा ठसा उमटवला आहे. गेलला मात्र अद्याप सूर गवसलेला नाही आणि गुजरातविरुद्ध तो सापडेल अशी अपेक्षा आहे. वॉटसन आणि युझवेंद्र चहल यांनी गोलंदाजीत छाप सोडली असली तरी स्टुअर्ट बिन्नी, वरुण अरोन आणि ख्रिस जॉर्डन यांचे अपयश संघासाठी डोकेदुखी ठरत आहे.
दरम्यान, कर्णधार सुरेश रैनाच्या अनुपस्थितीत ब्रेंडन मॅक्क्युलम, आरोन फिंच आणि ड्वेन स्मिथ या शिलेदारांवर मोठी जबाबदारी आहे. मधल्या फळीत रैनाला रवींद्र जडेजा आणि दिनेश कार्तिक यांची उपयुक्त साथ मिळत आहे.
सामन्याची वेळ : दुपारी ४ वाजल्यापासून.
थेट प्रक्षेपण : सेट मॅक्स/एचडी, सोनी सिक्स/एचडी.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा