गुणवान खेळाडूंचा भरणा असूनही सध्या सहाव्या स्थानावर असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघाला बाद फेरीत पोहोचण्यासाठी आता निकराचे प्रयत्न करावे लागणार आहेत. दुसरीकडे सनरायझर्स हैदराबादचा संघ गुणतालिकेतील त्यांचे पहिले स्थान अबाधित राखण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

बंगळूरुच्या संघाने मुंबई इंडियन्स संघावर मिळवलेल्या विजयानंतर तरी त्यांचे विजयी अभियान सुरू राहणे आवश्यक बनले होते. मात्र, चेन्नईकडून दुसऱ्यांदा पराभव स्वीकारावा लागलेल्या बेंगळूरु संघाचा प्रवास सातत्याने एक पाऊल पुढे आणि दोन पावले मागे असाच सुरू आहे. कामगिरीत सातत्य राखण्यात अपयशी ठरलेल्या बंगळूरुला आजच्या सामन्यात तर विजय अत्यावश्यक होऊन बसला आहे. बंगळूरु संघाला बाद फेरीत पोहोचण्यासाठी आता प्रत्येक सामना जिंकण्याबरोबरच अन्य स्पर्धेतील संघांच्या कामगिरीवरदेखील अवलंबून राहावे लागणार आहे. आता विराट कोहली आणि एबी डी’ व्हिलिअर्सला त्यांच्या फलंदाजीच्या बळावरच सामने जिंकून दाखवण्याची किमया साधावी लागणार आहे. ब्रेंडन मॅक्क्युलम आणि पार्थिव पटेल आणि मनदीपसिंग यांना फलंदाजीत खूप चांगली कामगिरी करून दाखवणे आवश्यक बनले आहे. उमेश यादव, यजुवेंद्र चहल, मोहम्मद सिराज आणि वॉशिंग्टन सुंदर यांना गोलंदाजीत अधिक धार आणावी लागणार आहे.

दुसरीकडे हैदराबादचा संघ स्पर्धेत सातत्याने त्यांच्या कामगिरीत सुधारणा करीत आहे. आपल्या वैविध्यपूर्ण गोलंदाजीच्या बळावर कमी धावांवरदेखील विजय मिळवण्याचे कौशल्य हैदराबादच्या संघाने आधीच दाखवून दिले आहे. दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध तर हैदराबादने मोठय़ा धावसंख्येचाही यशस्वी पाठलाग करीत विजय मिळवल्याने त्यांच्या आत्मविश्वासात अधिकच भर पडली असणार. कर्णधार केन विल्यमसनची फलंदाजी आणि त्याचे नेतृत्व सामन्यागणिक अधिक बहरत आहे. हैदराबादचा प्रमुख गोलंदाज भुवनेश्वरकुमार पुन्हा संघात परतल्याने त्यांच्या गोलंदाजीला अजून धार येणार आहे. शिखर धवनचा तुलनात्मकदृष्टय़ा कमी असलेला स्ट्राइकरेट आणि मधल्या फळीतील फलंदाजांची काहीशी कमजोर कामगिरी यावर हैदराबादला तोडगा शोधावा लागणार आहे. मात्र, गोलंदाजीत राशीद खान, सिद्धार्थ कौल, संदीप शर्मा आणि शाकिब अल हसनने त्यांच्या प्रभावी कामगिरीत सातत्य राखले आहे.

  • सामन्याची वेळ : रात्री ८ वाजता
  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस

Story img Loader