Ellyse Perry Batting Video : महिला प्रीमियर लीगच्या १० वा सामना नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमध्ये लेंजर्स बंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात रंगला. आरसीबीने २० षटकांत ४ गडी गमावत १५० धावा केल्या. त्यानंतर विजयाचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या दिल्लीने ६ विकेट्स राखून १५४ धावा करत आरसीबीचा पराभव केला. दिल्लीच्या मारिझान काप-जेस जोनासनने आक्रमक फलंदाजी केली. पण क्रिकेटविश्वात खरी चर्चा रंगली ती आरसीबीची धडाकेबाज फलंदाज एलिस पेरीची.
कारण कर्णधार स्मृती मंधाना स्वस्तात माघारी परतल्यानंतर एलिसने चौफेर फटकेबाजी करत गोलंदाजांना घाम फोडला. पेरीने ५२ चेंडूत ६७ धावा कुटल्या. मैदानात ४ चौकार आणि ५ षटकारांचा पाऊस पाडत पेरीने आरसीबीला एका समाधानकारक धावसंख्येपर्यंत पोहोचवलं. पेरीने गोलंदाजांना समाचार घेत आरपार षटकार ठोकले. पेरीच्या फलंदाजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
इथे पाहा व्हिडीओ
स्मृती मंधाना गेल्या काही दिवसांपासून धावांसाठी संघर्ष करत आहे. काल झालेल्या सामन्यातही स्मृतीने १५ चेंडूंचा सामना करत फक्त ८ धावा केल्या. दिल्लीच्या शिखा पांडेच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारल्याने मंधाना झेलबाद झाली. त्यानंतर सोफी डीवाईनने डाव सावरला. पण २१ धावांवर असताना शिखाने सोफीचीही शिकार केली. पण त्यानंतर मैदानात पेरीने धावांचा डोंगरच रचला. रिचा घोषनेही पेरीला साथ देत आक्रमक खेळी केली. रिचाने १६ चेंडूत ३७ धावा कुटल्या. रिचाने चौफेर फटकेबाजी करत ३ चौकार आणि ३ षटकार ठोकले. पण रिचाही शिखाच्या गोलंदाजीवर बाद झाली.
एकीकडे शिखा पांडे आरसीबीच्या फलंदाजांना पव्हेलियनचा रस्ता दाखवत होती. तर दुसरीकडे पेरी गोलंदाजांचा समाचार घेत होती. दिल्लीसाठी कर्णधार मेग लॅनिंगने १८ चेंडूत १५ धावा केल्या. यूपी वॉरियर्स विरुद्ध वादळी खेळी करणाऱ्या शफाली वर्माला या सामन्यात भोपळाही फोडता आला नाही. मेगनच्या गोलंदाजीवर शफाली शून्यावर बाद झाली. त्यानंतप एलिस केप्सीने डाव सावरत २४ चेंडूत ३८ धावा कुटल्या. जेमिमा रॉड्रिग्जनेही चमकदार कामगिरी केली. जेमिमाने २८ चेंडूत ३२ धावांची खेळी साकारली. पण दिल्लीला सामना जिंकवण्यात मारिझान काप आणि जेस जोनासनचा खारीचा वाटा होता. कारण कापने ३२ चेंडूत ३२ धावा तर जोनासनने आक्रमक खेळी करत १५ चेंडूत २९ धावा करून दिल्लीला विजय संपादन करून दिला.