आरसीबीच्या संघाने मुंबई इंडियन्सचा अवघ्या ६ धावांनी पराभव करत पहिल्यांदाच अंतिम फेरीत धडक मारली आहे. १३६ धावांच्या साध्या लक्ष्याचा बचाव करत स्मृती मानधनाच्या नेतृत्त्वाखालील आरसीबी संघाने उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन केले आहे. विजयासह आरसीबीच्या संघाने WPL च्या इतिहासातील सर्वात कमी धावसंख्येचा बचाव करत मोठा विजय मिळवला. अखेरच्या षटकात मुंबई संघाला विजयासाठी १२ धावांची आवश्यकता होती आणि स्मृतीने आशा शोभना या अनुभवी गोलंदाजावर अखेरच्या षटकाची जबाबदारी सोपवली. शोभनाने १३व्या षटकानंतर थेट २०वे षटक टाकले आणि शेवटच्या षटकात केवळ ६ धावा देत संघाला विजय मिळवून दिला. अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध आरसीबी हे संघ भिडणार आहे.
स्मृती मानधनाच्या चाणाक्ष नेतृत्त्वाची झलकही या अटीतटीच्या सामन्यात पाहायला मिळाली. संपूर्ण आरसीबीच्या संघाने या कमी धावसंख्येचा बचाव करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले आणि ऐतिहासिक विजय मिळवला. एलिस पेरीची ६६ धावांची खेळी, वेयरहमचा डावाच्या शेवटच्या चेंडूवरील षटकार खूपच निर्णायक ठरला, ज्यामुळे आरसीबीचा संघ १३५ धावांपर्यंत पोहोचू शकला. यानंतर आरसीबीच्या सर्वच गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करत डिफेंडिंग चॅम्पियन मुंबई इंडियन्सला नमवले.
आरसीबीने मुंबईला विजयासाठी १३६ धावांचे आव्हान दिले. मुंबईसाठी सहज साध्य होणारे हे लक्ष्य होते तरी आरसीबीच्या संघाने सुरूवातीपासूनच सामन्यावर पकड कायम ठेवली होती. आरसीबीची शानदार युवा गोलंदाज श्रेयंका पाटील हिने हिली मॅथ्यूजला क्लीन बोल्ड करत संघाला पहिला ब्रेकथ्रू मिळवून दिला.स्किव्हर-ब्रंट आणि यस्तिका यांनी संघाचा डाव सांभाळला खरा भाटिया पेरीच्या गोलंदाजीवर १९ धावा करत क्लीन बोल्ड झाली. तर वेयरहमने स्किव्हर-ब्रंटला २३ धावांवर त्रिफळाचीत करत पॅव्हेलियनमध्ये धाडले.
अमेलिया केरसोबत मुंबई संघाची कर्णधार आणि अनुभवी फलंदाज हरमनप्रीत कौर यांनी संघाला सावरले. हरमनच्या बॅटवरही आरसीबीच्या गोलंदाजांनी आपला दबदबा कायम राखला. श्रेयंका पाटीलच्या गोलंदाजीवर हरमन ४ चौकारांच्या मदतीने ३३ धावा करत झेलबाद झाली. त्यानंतर रिचा घोषने सजना सजीवनला शानदार स्टंम्पिंग करत बाद केले. हरमननंतर सजना ही तिच्या कमाल शॉट्ससाठी ओळखली जाते. त्यामुळे तिच्या विकेटमुळे सामना खऱ्या आरसीबीच्या बाजूने झाला. त्यानंतर रिचा घोषने पूजा वस्त्राकर हिला शेवटच्या षटकात स्टंम्पिंग केले.
तत्पूर्वी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. स्मृतीने सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर चौकार लगावत दणक्यात सुरूवात केली. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. संघाच्या दोन्ही सलामीवीर १० धावा करत लागोपाठ बाद झाल्या. हेली मॅथ्यूजच्या गोलंदाजीवर डिव्हाईन क्लीन बोल्ड झाली तर स्किव्हर-ब्रंटच्या गोलंदाजीवर झेलबाद झाली. तिसऱ्या क्रमांकावर आलेली दिशा सकट खाते न उघडताच साइकाच्या गोलंदाजीवर झेलबाद झाली. मुंबईच्या कमाल गोलंदाजीमुळे आरसीबीला मधल्या षटकांमध्ये फारशा धावा मिळाल्या नाहीत. त्यानंतर आरसीबी संघाची संकटमोचक रिचा घोषसुध्दा १४ धावा करत बाद झाली.
अष्टपैलू आणि विस्फोटक फलंदाज एलिस पेरीने पुन्हा एकदा एकटीने संघाचा डाव सावरला.मॉलिनेक्स ११ धावांची भर घालत स्किव्हर-ब्रंटच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाली. साइकाने पेरीला बाद करण्यापूर्वी तिने ५० चेंडूत १ षटकार आणि ८ चौकारांच्या मदतीने ६६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. वेअरहम डावाच्या शेवटच्या चेंडूवर लांबलचक षटकार खेचत संघाची धावसंख्या १३५ वर आणून ठेवली.