२७ आणि २८ जानेवारी रोजी बंगळुरुत होणाऱ्या आयपीएलच्या अकराव्या हंगामाच्या लिलावासाठी अवघ्या महिन्याभराचा कालावधी शिल्लक असताना, विराट कोहलीला संघात कायम राखायचं की नाही यावरुन रॉयल चँलेजर्स बंगळुरु संघ प्रशासन संभ्रमात आहे. विराट कोहली आणि एबी डिव्हीलियर्सपैकी कोणाला संघात जागा द्यावी यावरुन बंगळुरु संघात उहापोह सुरु असल्याचं समजतंय.
‘अहमदाबाद मिरर’ या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनूसार कोहलीला संघात कायम राखायचं की नाही यावरुन बंगळुरुच्या संघ प्रशासनात चर्चा सुरु आहे. वास्तविक पाहता गेली १० पर्व विराट कोहलीने रॉयल चँलेजर्स बंगळुरु संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. मात्र अकराव्या हंगामात खेळाडूंना कायम राखण्यासाठी बदललेल्या नियमांमुळे बंगळुरुच्या संघासमोर हा पेच निर्माण झाला आहे. जर एखाद्या खेळाडूला कायम राखायचं असेल, तर त्याच्या मानधनाचा किती भार टीमच्या निधीवर (८० कोटी) पडेल याबाबत हे स्पष्ट करण्यात आले आहे की, प्रमाण किंमत आणि खरी किंमत यापैकी जास्त असलेली किंमत गृहीत धरली जाईल. त्यामुळे विराटला कायम राखण्याबाबातचा निर्णय अद्यापही घेण्यात आला नसल्याचं सुत्रांचं म्हणणं आहे.
गेल्या महिन्यात आयपीएलच्या गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीत, प्रत्येक संघमालकांना ५ खेळाडूंना कायम राखण्याची मूभा देण्यात आली. यातील ३ खेळाडू हे आपल्या पसंतीचे तर २ खेळाडू हे ‘राईट टू मॅच’ कार्डाद्वारे कायम राखता येणार आहेत. याचसोबत लिलावाच्या वेळी प्रत्येक संघाला ८० कोटींचा निधी मिळणार आहे आणि लिलावात खेळाडूला मिळणारी रक्कम ही याच निधीतून कमी केली जाणार आहे. याआधी विराट कोहलीला बंगळुरुने १५ कोटींच्या रकमेवर विकत घेतलं होतं. मात्र बंगळरुच्या नियोजीत निधीतून फक्त १२ कोटींचा निधी वजा झाला होता. मात्र नवीन नियमांनूसार, विराट कोहलीवर १५ कोटींची बोली लागल्यास ती रक्कम संघाच्या मूळ रकमेतून वजा केली जाणार आहे. त्यामुळे आगामी लिलावात विराट कोहलीला रॉयल चँलेजर्स संघ कायम राखतो का हे पहावं लागणार आहे.