विराट कोहलीचेही अर्धशतक; हैदराबादवर ४५ धावांनी विजय
फटके बनवण्याची अद्वितीय कला अवगत असलेल्या एबी डि’व्हिलियर्सची धमाकेदार फलंदाजी एम. चिन्नास्वामी स्डेडियमवर नरजेचे पारणे फेडणारे ठरली. चेंडू कसाही, कुठेही पडला तरी त्याच्यावर डि’व्हिलियर्सकडे उत्तर होते. त्याच्या फटक्यांमधील नजाकत चाहत्यांना अवीट आनंद देऊन गेली. नेत्रदीपक फटकेबाजी करत डि’व्हिलियर्सने फटकावलेले अर्धशतक आणि त्याला कर्णधार विराट कोहलीने दिलेली सुयोग्य साथ यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने प्रथम फलंदाजी करताना २२७ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादला १८२ धावा करता आल्या आणि बंगळुरुने ४५ धावांनी या हंगामातील पहिला सामना जिंकला.
प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या बंगळुरुला ख्रिस गेलच्या रुपात पहिला धक्का बसला. भुवनेश्वर कुमारने अप्रतिम चेंडू टाकत गेलच्या यष्टय़ांचा सुरेख वेध घेतला. गेलनंतर फलंदाजीला आलेल्या डि’व्हिलियर्सने स्थिरस्थावर व्हायला फार कमी चेंडू घेतले आणि त्यानंतर फटक्यांची धमाकेदार माळच त्याने लावली. आपल्या घणाघाती फटक्यांच्या जोरावर डि’व्हिलियर्सने हैदराबादच्या गोलंदजांना सळो की पळो करून सोडले होते. त्याने फिरकीपटू कर्ण शर्माला लगावलेले दोन षटकार गगनचुंबी होते. डि’व्हिलियर्स कोहलीनंतर फलंदाजीला आला असला तरी त्याने त्याच्यापूर्वी अर्धशतक पूर्ण केले. आशीष रेड्डीला अकराव्या षटकात चौकार लगावत त्याने अर्धशतक पूर्ण केले. विराट कोहली हा जगातला अव्वल फलंदाज समजला जात असला तरी डि’व्हिलियर्सच्या खेळीपुढे कोहलीची ही खेळी नक्कीच झाकोळली गेली. डि’व्हिलियर्सने फक्त ४२ चेंडूंत सात चौकार आणि सहा चौकारांच्या जोरावर ८२ धावांची खेळी साकारली, तर कोहलीने ५१ चेंडूंत सात चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ७५ धावा केल्या. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १५७ धावांची भागीदारी रचली. त्यानंतर सर्फराझ खानने १० चेंडूंत ३५ धावा चोपून काढल्या.
बंगळुरुच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने दमदार सुरुवात केली. वॉर्नरने २५ चेंडूंत चार चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर ५८ धावा फटकावल्या, पण शेन वॉटसनने त्याचा काटा काढला आणि हैदराबादला त्यानंतर आव्हानाचा पाठलाग करणे जमले नाही.
संक्षिप्त धावफलक
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : २० षटकांत ४ बाद २२७ (एबी डी’व्हिलियर्स ८२, विराट कोहली ७५, सर्फराझ खान ३५, मुस्ताफिझूर रहमान २/२६) विजयी वि. सनरायझर्स हैदराबाद : २० षटकांत ६ बाद १८२ (डेव्हिड वॉर्नर ५८, आशीष रेड्डी ३२; शेन वॉटसन २/३०)
सामनावीर : एबी डी’व्हिलियर्स.

Story img Loader