बाद फेरीत स्थान पटकावण्याच्या उद्देशाने राजस्थान रॉयल्सने आता चांगलीच कंबर कसली आहे. पुणे वॉरियर्सविरुद्ध १७९ धावांचे आव्हानही पेलत दमदार विजय मिळवणारा रॉयल्सचा संघ आता दिल्ली डेअरडेव्हिल्सशी दोन हात करण्यास सज्ज झाला आहे. चांगल्या सुरुवातीनंतर सातत्य राखता न आल्याने राजस्थानच्या बाद फेरीच्या आशा धुसर झाल्या होत्या. मात्र फलंदाजी आणि गोलंदाजी तसेच क्षेत्ररक्षण तिन्हीमध्ये आमूलाग्र सुधारणा करत राजस्थानने बाद फेरीसाठी आपली दावेदारी सिद्ध केली आहे.
अजिंक्य रहाणेने पुण्याविरुद्ध अर्धशतकी खेळी साकारत संघाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. अनुभवी खेळाडू आणि कर्णधार राहुल द्रविडनेही संयमी खेळी करत फॉर्ममध्ये असल्याचे सिद्ध केले आहे. शेन वॉटसनकडून पुन्हा एकदा तडाखेबंद खेळीची अपेक्षा आहे. संजू सॅमसन, स्टुअर्ट बिन्नी आणि ब्रॅड हॉग हे त्रिकूट दडपणाच्या क्षणी उपयुक्त खेळी करण्यात माहीर आहे. गोलंदाजीत शेन वॉटसनचा अनुभव राजस्थानसाठी महत्त्वाचा आहे. धावा रोखणे आणि विकेट्स काढण्याच्या बाबतीत जेम्स फॉल्कनर हा रॉयल्ससाठी हुकमी एक्का आहे. सिद्धार्थ त्रिवेदी आणि अजित चंडिला हे दोघेही सातत्यपूर्ण प्रदर्शन करत आहे. पाचव्या गोलंदाजीची जबाबदारी स्टुअर्ट बिन्नी आणि केव्हॉन कूपर यांच्यावर आहे.
अव्वल खेळाडूंची तगडी फौज दिमतीला असूनही दिल्ली डेअरडेव्हिल्सची कामगिरी सामन्यागणिक ढासळत आहे. शेवटच्या अर्थात हैदराबाद सनरायजर्स विरुद्धच्या लढतीत दिल्लीचा डाव ८० धावांतच संपुष्टात आला होता. या दारुण पराभवामुळे दिल्लीचे बाद फेरीत जाण्याचे स्वप्न संपुष्टात आले आहे. उर्वरित लढतीत त्यांना सन्मान वाचवण्यासाठी खेळावे लागणार आहे. वीरेंद्र सेहवाग आणि महेला जयवर्धने आपल्या लौकिलाला साजेसा खेळ करतील अशी दिल्ली संघव्यवस्थापनाला आशा आहे. डेव्हिड वॉर्नर फलंदाजीत सातत्यपूर्ण खेळ करत आहे, मात्र त्याला दुसऱ्या बाजूने साथ मिळणे अपेक्षित आहे. उन्मुक्त चंद तसेच मनप्रीत जुनेजा छाप सोडण्यात अपयशी ठरले आहेत. जोहान बोथा, जीवन मेंडिस, आंद्रे रसेल हे त्रिकूट सपशेल अपयशी ठरल्याने दिल्लीच्या चिंता वाढल्या आहेत. गोलंदाजीत उमेश यादव ही दिल्लीसाठी एकमेव आशा आहे. मॉर्ने मॉर्केल, इरफान पठाण, आशीष नेहरा, अजित आगरकर यांच्यापैकी एकाला तरी सूर गवसावा, अशी प्रार्थना दिल्ली संघाला करावी लागणार आहे.
सामना : राजस्थान रॉयल्स वि दिल्ली डेअरडेव्हिल्स
स्थळ : सवाई मानसिंग स्टेडियम, जयपूर
वेळ : दुपारी ४ वाजल्यापासून.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा