आज दुबईत रंगणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याआधी, दोन्ही संघांमध्ये शाब्दीक द्वंद्वाला सुरुवात झाली आहे. भारतीय संघासाठी स्पर्धेच्या आयोजन समितीने वेळापत्रकात बदल करुन, भारताचे सर्व सामने दुबईला ठेवले आहेत. मात्र इतर संघांना दुबई आणि अबुधाबी या दोन्ही मैदानांवर सामने खेळायचे आहेत. नेमक्या याच मुद्द्यावर पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमदने बोट ठेवलं आहे.
“या स्पर्धेचं आयोजन भारतीय संघाला डोळ्यासमोर ठेऊन करण्यात आल्यासारखं वाटतं आहे. जरी भारत साखळी सामन्यात हरला, तरीही त्यांना पुढचे सामने हे दुबईत खेळायचे आहेत. प्रवास हा खूप मोठा मुद्दा आहे, एक सामना जिंकल्यानंतर तुम्ही दीड तास प्रवास करता आणि नंतरच्या सामन्यासाठी तुम्हाला सरावासाठी एक दिवस मिळतो, कोणत्याही खेळाडूसाठी हे वेळापत्रक थकवणारं आहे.” आयोजनावर सरफराजने आपली नाराजी व्यक्त केली.
अवश्य वाचा – Asia Cup 2018 : पाकिस्तानविरुद्ध सामन्याआधी भारत संघात करु शकतो हे २ बदल
भारत असो अथवा पाकिस्तान, दोन्ही संघांसाठी नियम सारखेच असायला हवेत. आशियाई क्रिकेट परिषदेने वेळापत्रक आखताना या गोष्टींचा विचार केलेला मला दिसतं नाही. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यावर जरुर काहीतरी विचार करेल असा आत्मविश्वासही सरफराजने व्यक्त केला आहे. याआधीही बीसीसीआयने टाकलेल्या दबावानंतर स्पर्धेच्या आयोजनाचं ठिकाण पाकिस्तानवरुन दुबईत हलवण्यात आलं होतं.