न्यूझीलंडविरुद्ध बुधवारपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान शेन शिलिंगफोर्ड आणि मार्लन सॅम्युअल्स या फिरकीपटूंच्या गोलंदाजीच्या शैलीबाबतचा निर्णय जाहीर करू नये, यासाठी वेस्ट इंडिज आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे दाद मागणार आहे. या दोघांच्या गोलंदाजी शैलीबाबतचा निर्णय कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी लागणार आहे. पण हे योग्य नव्हे, असे वेस्ट इंडिजचे प्रशिक्षक ओटिस गिब्सन यांनी म्हटले आहे.
गेल्या महिन्यात भारताविरुद्ध मुंबईत झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान शिलिंगफोर्ड आणि सॅम्युअल्स यांच्या गोलंदाजी शैलीबाबत पंचांनी आक्षेप घेतला होता. आयसीसीने त्यांना ऑस्ट्रेलियात वैयक्तिक चाचणीला सामोरे जाण्यास सांगितले होते.
आयसीसीकडे १४ दिवसांनंतर याबाबतचा अहवाल सादर होणार आहे. त्यामुळे कसोटीच्या तिसऱ्या दिवशी याबाबतचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. ‘‘सध्या तरी आम्ही सर्व काही आयसीसीवरच सोडले आहे. पण सामन्यादरम्यान निर्णय सुनावणे योग्य नाही,’’ असे गिब्सन म्हणाले.