D Gukesh vs Ding Liren: भारताच्या डी गुकेशने वयाच्या अवघ्या १८व्या वर्षी विश्वविजेता होण्याचा मान पटकावला आहे. जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप २०२४ च्या १४ व्या डावात गुकेशने माजी विश्वविजेता डिंग लिरेनचा पराभव केला. जगभरातून डी गुकेशचं मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. पण रशियाला मात्र गुकेशच्या विजयाचा फारसा आनंद झालेला नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चेस फेडरेशन ऑफ रशियाचे (सीएफआर) अध्यक्ष आंद्रेई फिलाटोव्ह यांनी डिंग लिरेनवर डी गुकेशविरुद्धच्या जागतिक विजेतेपदाचा सामना जाणूनबुजून हरल्याचा आरोप केला आहे. आंद्रेई फिलाटोव्ह यांनी एफआयडीईकडे चौकशी सुरू करण्याची मागणी केली आहे. ही माहिती युक्रेनच्या बुद्धिबळ संघाचे प्रशिक्षक पीटर हेन निल्सन यांनी रशियन वृत्तसंस्था TASS च्या हवाल्याने X (पूर्वीचे ट्विटर) वर शेअर केली आहे.

हेही वाचा – Who is D Gukesh: कोण आहे डी गुकेश? वडिलांनी करिअर लावलं पणाला अन् लेक १८व्या वर्षी ठरला विश्वविजेता; वाचा त्याची कहाणी

“या सामन्याच्या निकालामुळे व्यावसायिक आणि बुद्धिबळ चाहत्यांमध्ये घबराट निर्माण झाली,” असे रशियन वृत्तसंस्थेने आंद्रेई फिलाटोव्ह यांच्या हवाल्याने म्हटले आहे. निर्णायक डावात चिनी बुद्धिबळपटूने केलेली चूक, त्याने खेळलेली चाल अत्यंत संशयास्पद आहे आणि FIDE द्वारे स्वतंत्र तपासणी आवश्यक आहे. डिंग लिरेन ज्या स्थितीत होते तिथून डाव गमावणं प्रथम श्रेणीतील खेळाडूसाठी देखील कठीण आहे. या सामन्यात चीनच्या बुद्धिबळपटूचा पराभव अनेक प्रश्न निर्माण करतो. हे जाणीवपूर्वक केले गेले असे दिसते, असे चेस फेडरेशन ऑफ रशियाच्या अध्यक्षांचे म्हणणे आहे.

हेही वाचा – D Gukesh Prize Money: करोडपती झाला विश्विविजेता गुकेश, जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकल्यानंतर किती मिळाली बक्षिसाची रक्कम?

TASS ने नमूद केले की बरोबरीच्या गेममध्ये, डिंग लिरेनने ५५व्या चालीवर चूक केली, त्यानंतर गुकेशने आघाडी घेतली. गुकेश वयाच्या १८ व्या वर्षी सर्वात तरुण जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन बनला. त्याने शेवटच्या सामन्यात गतविजेत्या डिंग लिरेनचा पराभव केला. त्याच्या विजयाने भारतीय बुद्धिबळपटूंच्या वर्चस्वाच्या नव्या युगाची सुरुवात झाली. महान बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांचा वारसा त्याने पुढे नेला.

विश्वनाथन आनंद यांच्यानंतर विश्वविजेते पद पटकावणारा डी गुकेश हा दुसरा भारतीय ठरला. विश्वनाथन आनंद यांनी आपल्या कारकिर्दीत पाच वेळा विश्वविजेता होण्याचा मान पटकावला. योगायोगाने, ५५ वर्षीय विश्वनाथन आनंद यांनी चेन्नईतील बुद्धिबळ अकादमीमध्ये डी गुकेशला एक परिपूर्ण खेळाडू बनवण्यात मोलाचा वाटा उचलला आहे.

हेही वाचा – आनंदनंतरचा विश्वनाथ! सर्वांत तरुण बुद्धिबळ जगज्जेता डी. गुकेश

डी गुकेशने सामन्यातील १४ वा आणि अंतिम क्लासिकल टाईम कंट्रोल डाव जिंकत डिंग लिरेनच्या ६.५ विरूद्ध ७.५ गुण मिळवले. गुकेश आणि डिंग लिरेन यांच्यातील १४ वा डाव अनिर्णित होताना दिसत होता, पण अखेरीस लिरेनची एक चूक अन् गुकेशने विश्वविजेते होण्याचा मान पटकावला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Russia accused ding liren of deliberately losing world chess championship to d gukes russian federation chief bdg