रशिया व भारत यांच्यात १९७४ मध्ये पुण्यात झालेला डेव्हिस चषक सामना म्हणजे आमच्यासाठी घरचेच लग्नकार्य असल्याची भावना होती. हा सामना पुण्यात आयोजित करण्याचे निश्चित झाल्यानंतर माझे पती दत्ताजी यांच्यासह येथील सर्वच टेनिसमंडळी अहोरात्र हा सामना यशस्वी करण्यासाठी झटली होती. त्यामुळेच आजही डेव्हिस चषक सामना म्हटले की ते सोनेरी दिवस आठवतात, असे या सामन्याच्या संयोजनात वाटा उचलणाऱ्या ज्येष्ठ संघटक आशाताई शिंदे यांनी सांगितले.

दत्ताजी व आशाताई यांचे टिळक रस्त्यावर क्रीडा साहित्याचे दुकान होते. १९७४ मधील डेव्हिस लढतीत सहभागी झालेले आनंद व विजय अमृतराज बंधू, शशी मेनन, जसजितसिंग, रामनाथन कृष्णन आदी सर्वच खेळाडूंच्या टेनिस रॅकेट्सना गटिंग करण्याची जबाबदारी शिंदे दाम्पत्याकडे आली. दत्ताजी स्वत: टेनिस खेळत असल्यामुळे त्यांनी ही जबाबदारी कोणताही आर्थिक मोबदला न घेता पार पाडली. दत्ताजी यांना या कामात आशाताई यांनीही बहुमोल साथ दिली.

या सामन्याविषयी आशाताई यांनी सांगितले, ‘‘शशी मेननचे वडील त्या वेळी खडकी येथील अ‍ॅम्युनिशन फॅक्टरीत नोकरीस होते. शशीला सराव मिळावा यासाठी ते शशी याला भर दुपारच्या उन्हात आमच्याकडे घेऊन येत असत. दत्ताजी हे शशीला घेऊन जिमखान्यावर सरावाला घेऊन जात असत. या सरावाचा शशी याला भरपूर लाभ झाला. या सरावाच्या निमित्ताने शशी हा आमच्या कुटुंबातील एक सदस्यच झाला होता. तो दत्ताजी यांना गुरुस्थानी मानत असे.’’

आशाताई पुढे म्हणाल्या, ‘‘रणजित हा माझा मुलगा त्या वेळी लहान होता. त्याला टेनिसची खूप आवड होती. त्याने विजय अमृतराज याच्याबरोबर खेळण्याचा हट्ट धरला. टेनिस रॅकेट्सच्या कामानिमित्त सर्वच भारतीय खेळाडूंची दत्ताजींबरोबर मैत्री झाली होती. रणजित याचा खेळण्याचा हट्ट विजय याने पूर्ण केला. रणजित याची रॅकेट धरण्याची शैली, त्याचा खेळ पाहून हा मुलगा पुढे चांगला खेळाडू होईल. त्याला टेनिसमध्येच कारकीर्द घडवण्याची संधी द्यावी, हा विजयने दिलेला सल्ला दत्ताजी यांनी मान्य केला. रणजित याने स्पर्धात्मक टेनिसचा भरपूर आनंद घेतला. तो न्यूझीलंडमधील टेनिस अकादमीतच प्रशिक्षक म्हणून काम करीत आहे. न्यूझीलंडच्या कनिष्ठ डेव्हिस चषक संघाबरोबर प्रशिक्षक म्हणूनही त्याने यशस्वी जबाबदारी सांभाळली होती. या संघाबरोबर त्याने भारताचाही दौरा केला होता.’’

Story img Loader