जागतिक उत्तेजक प्रतिबंधक समितीने (वाडा) येथील उत्तेजक प्रतिबंधक प्रयोगशाळेची मान्यता काढून घेतल्यानंतर या प्रयोगशाळेचे प्रमुख ग्रिगोरी रोडचेन्कोव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
रशियाचे अनेक धावपटू उत्तेजक चाचणीत दोषी असूनही त्यांच्या चाचणी अहवालात ते निदरेष दाखविले गेले आहेत. रशियाच्या अॅथलेटिक्स महासंघाकडूनच यासाठी मोठय़ा प्रमाणात लाच घेतली गेली असल्याचे ‘वाडा’ या संस्थेने दिलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात ग्रिगोरी यांचा सहभाग असल्याचाही आरोप या अहवालात करण्यात आला आहे.
क्रीडा मंत्री व्हिटाली मुटको यांच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार ग्रिगोरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा क्रीडा मंत्रालयाकडे पाठविला
असून हा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे. त्यांच्या जागी मारिया दिकूनेट्स यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
रशियाचे अनेक धावपटू विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये सर्वोत्तम कामगिरी करताना उत्तेजकाची मदत घेत असतात, मात्र त्यांना रशियन अॅथलेटिक्स महासंघ तसेच तेथील शासनाकडूनही झाकले जाते असा आरोप ‘वाडा’ संस्थेने केला आहे.