आयपीएल स्पर्धेत संघांचं नेतृत्व करणाऱ्या चार भारतीय कर्णधारांचा आयसीसी ट्वेन्टी२० वर्ल्डकपसाठी विचार होऊ शकलेला नाही. स्ट्राईकरेटच्या मुद्यामुळे के.एल.राहुलवर सातत्याने टीका होते. दुखापतीतून सावरत पुनरागमन करत कोलकाता संघाची धुरा सांभाळणाऱ्या श्रेयसचा वर्ल्डकपसाठी विचार झाला नाही. महेंद्रसिंग धोनीचा वारसा चालवणाऱ्या ऋतुराज गायकवाडलाही भारतीय संघाचे दरवाजे उघडले नाहीत. चाळिशीकडे झुकलेला आणि पंजाबचं नेतृत्व करणारा शिखर धवन निवडसमितीच्या स्कीम ऑफ थिंग्ज अर्थात योजनांमधून बाहेर झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हे चौघंही आयपीएल स्पर्धेत आपापल्या संघाचं नेतृत्व करत आहेत. चेन्नई सुपर किंग्ससारख्या ५ जेतेपदं नावावर असणाऱ्या चेन्नईची जबाबदारी ऋतुराजकडे आहे. २०२१ मध्ये ऋतुराजने भारतासाठी ट्वेन्टी२० पदार्पण केलं. ऋतुराजने भारतासाठी १९ सामने खेळले असून एक शतक आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. आयपीएलच्या सध्या सुरू असलेल्या हंगामात तो उत्तम फॉर्मात असून काही दिवसांपूर्वीच त्याने शतकी खेळी साकारली होती. शतकाच्या बरोबरीने ऋतुराजने तीन अर्धशतकं झळकावली आहेत. मात्र त्याचा वर्ल्डकपसाठी विचार होऊ शकलेला नाही.

लखनौ सुपरजायंट्स हा आयपीएल स्पर्धेतला नवा संघ आहे. राहुल सलामीवीर, कर्णधार आणि यष्टीरक्षक अशा तिहेरी भूमिकेत आहे. संथ खेळी करण्यामुळे राहुलवर वारंवार टीका होते. राहुलने ७२ ट्वेन्टी२० सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्याच्या नावावर २२६५ धावा असून २ शतकं आणि २२ अर्धशतकांचा समावेश आहे. भारतीय संघाच्या नेतृत्वाची जबाबादारीही त्याने हाताळली आहे.

दुखापतीमुळे श्रेयस अय्यर प्रदीर्घ काळ भारतीय संघापासूनही दूर होता. आयपीएलच्या निमित्ताने त्याने दमदार पुनरागमन केलं आहे. कोलकाता संघाची मोट बांधण्यात तो यशस्वी ठरला आहे. पण ट्वेन्टी२० वर्ल्डकपसाठी श्रेयसच्या नावाचा विचार झालेला नाही. श्रेयसने ५१ ट्वेन्टी२० लढतीत भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. या प्रकारात श्रेयसच्या नावावर ११०४ धावा असून ८ अर्धशतकांचा समावेश आहे.

चाळिशीकडे झुकलेला शिखर धवनचा वनडे वर्ल्डकपसाठी विचार झाला नाही तेव्हाच निवडसमितीच्या योजनांमधून त्याचं नाव बाहेर झाल्याचं स्पष्ट झालं. शिखरने ६८ ट्वेन्टी२० सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं असून १७५९ धावा केल्या आहेत. यामध्ये ११ अर्धशतकांचा समावेश आहे. धवन दुखापतग्रस्त झाल्याने आयपीएलच्या यंदाच्या हंगामात इंग्लंडचा सॅम करन नेतृत्वाची जबाबदारी सांभाळतो आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ruturaj gaikwad kl rahul shreyas iyer shikhar dhawan four indian ipl captains sidelined for icc t20 world cup psp