Ryan Rickelton Century AFG vs SA Match Updates in Marathi: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सलग तिसऱ्या सामन्यात शतकी खेळी पाहायला मिळाली. न्यूझीलंड, भारत आणि बांगलादेशच्या फलंदाजांनंतर आता दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूनेही या स्पर्धेत शतक झळकावले आहे. पाकिस्तान-यूएईमध्ये सुरू असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर रायन रिक्लेटनने शानदार शतक झळकावले. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात रिकल्टनने अवघ्या १०२ चेंडूत हे शतक झळकावले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रायन रिकल्टनसाठी हे शतक खूप खास होते कारण त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीत त्याने प्रथमच शतक झळकावले आहे. म्हणजेच हे रायन रिकल्टनचे एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले आहे. सुमारे २ वर्षांपूर्वी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या रिक्लेटनने नुकतेच एकदिवसीय संघात आपले स्थान पक्के केले होते, परंतु तो त्याच्या पहिल्या शतकाच्या प्रतिक्षेत होता आणि अखेरीस चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यात त्याची ही प्रतिक्षा संपली.

कराचीतील नॅशनल स्टेडियमवर शुक्रवारी २१ फेब्रुवारी रोजी झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तिसऱ्या सामन्यात रायन रिक्लेटनने हे शानदार शतक झळकावले. प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेसाठी सलामीला आलेल्या रायनने कर्णधार टेम्बा बावुमासह शतकी भागीदारी केली आणि त्यानंतर आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील पहिले शतक पूर्ण केले. यासह रायन रिकल्टन हा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शतक झळकावणारा दक्षिण आफ्रिकेचा पहिला यष्टीरक्षक फलंदाज ठरला आहे.

डावखुरा फलंदाज रिक्लेटनने ३५व्या षटकात मोहम्मद नबीच्या पहिल्या चेंडूवर एक धाव घेत शतक पूर्ण केले. आपला सातवा एकदिवसीय सामना खेळणाऱ्या रिक्लेटनने यापूर्वी केवळ एक अर्धशतक झळकावले होते आणि त्याची सर्वोच्च धावसंख्या ९१ धावा होती. रिकल्टनने ७ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने शतक पूर्ण केले.

शतकानंतर झाला धावबाद

शतक झळकावल्यानंतर रिक्लेटन फार काळ टिकू शकला नाही आणि तो दुर्दैवाने धावबाद झाला. रशीद खानचा एक चेंडू खेळण्याचा प्रयत्न करत असताना त्याने फटका गोलंदाजाच्या दिशेने लगावला. रशीदने चपळाई दाखवत लगेच चेंडू पकडला आणि परत यष्टिरक्षकाच्या दिशेने फेकला. ज्यामुळे रिकल्टन १०३ धावांवर धावबाद झाला.

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शतकांचा पाऊस

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शतक झळकावणारा तो पाचवा फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी न्यूझीलंडच्या विल यंग आणि टॉम लॅथम यांनी स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात शतकं झळकावली होती. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात बांगलादेशच्या तौहीद हृदोयने कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. आता रिक्लेटनच्या खेळीने सलग तिसऱ्या सामन्यात शतक झळकावले आहे.