चॅम्पियन्स ट्रॉफीत तिसरा सामना अफगाणिस्तान वि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळवला जात आहे. दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करत ३१५ धावा केल्या. यादरम्यान आफ्रिकेचा सलामीवीर रायन रिकल्टनने शतक झळकावले. रिकल्टनचे हे वनडेमधील पहिले शतक होते. पण ज्या पद्धतीने रिकल्टन बाद झाला, त्याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.
कराचीच्या मैदानावर रायन रिकेल्टनने अफगाणिस्तानविरुद्ध शानदार फलंदाजी केली आणि शतक झळकावले. यानंतर तो राशीद खानच्या षटकात फलंदाजी करत होता. राशिद खानविरुद्ध पुढे येऊन खेळण्याचा त्याने प्रयत्न केला. त्याचा चेंडू थेट राशिद खानकडे गेला आणि रशीदने लगेच चेंडू यष्टीरक्षकाजवळ फेकला. तोपर्यंत रायन रिकेल्टन क्रीजच्या बाहेर गेला होता आणि वेळेत परत क्रिझवर पोहोचू शकला नाही, त्यामुळे रशीद खान आणि गुरबाजच्या वेगामुळे तो धावबाद झाला. आता या विकेटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
रायन रिकेल्टनने अफगाणिस्तानविरुद्ध शानदार फलंदाजी केली, त्यादरम्यान त्याने आपल्या डावात एकूण १०६ चेंडूंचा सामना केला आणि १०३ धावा केल्या. यादरम्यान रिकेल्टन ७ चौकार आणि एका षटकारासह महत्त्वपूर्ण खेळी केली, त्यानंतर तो धावबाद झाला. रिकल्टनने संघाला एक उत्कृष्ट सुरूवात करून दिली आणि मोठ्या धावसंख्येचा पाया रचला.
रिकल्टननंतर दक्षिण आफ्रिकेच्या तीन फलंदाजांनी वादळी अर्धशतकी केली. रायन रिकल्टनसह कर्णधार टेम्बा बावुमाने १०० धावांची भागीदारी केली. टेम्बा बावुमा ५८ धावांची खेळी करत बाद झाला. त्यानंतर रासी व्हॅन डेर डुसेनने ५२ धावांची खेळी केली. तर एडन मारक्रमने ३६ चेंडूत १ षटकार आणि ६ चौकारांसह ५२ धावांची खेळी केली.
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये आतापर्यंत एकूण २ सामने खेळले गेले आहेत, पहिल्या सामन्यात न्यूझीलंड संघाने पाकिस्तानचा पराभव केला होता, तर दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशचा पराभव केला आहे.