Sreesanth commented on Gautam’s post and asked some questions : भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर आणि माजी वेगवान गोलंदाज एस श्रीसंत यांच्यातील वाद वाढत चालला आहे. बुधवारी लिजेंड्स लीग क्रिकेट २०२३ (एलएलसी) सामन्यादरम्यान दोघांमध्ये जोरदार वाद झाला. गंभीर इंडिया कॅपिटल्सकडून खेळत होता, तर श्रीसंत गुजरात जायंट्सकडून खेळत होता. या माजी वेगवान गोलंदाजाने नंतर दावा केला की गौतमने त्याला सामन्यादरम्यान ‘फिक्सर’ म्हटले होते. या घटनेनंतर गंभीरने स्वतःचा एक जुना फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. यात तो हसत आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘जेव्हा लोक फक्त जगाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत असतात, तेव्हा हसत रहा.’ आता श्रीसंतने त्याच्या पोस्टवर थेट कमेंट करून आपला राग काढला.
सामन्यानंतरही एस श्रीसंतने एक व्हिडीओ शेअर केला होता, ज्यामध्ये त्याने मैदानावर काय घडले, याबाबत सांगितले. त्याने गौतम गंभीरवर असभ्य शब्दाचा वापर केल्याचा आरोप केला होता. तसेच मिस्टर फायटर विनाकारण त्याच्या सर्व सहकाऱ्यांशी भांडतो. तो त्याच्या वरिष्ठांचाही आदर करत नाही, अगदी वीरू भाई (सेहवाग)चाही नाही. आजही तेच घडले. कोणतीही चिथावणी न देता तो माझ्याशी काहीतरी बोलत राहिला, जे अत्यंत असभ्य होते. त्याने त्या गोष्टी बोलायला नको होत्या, असे श्रीसंत म्हणाला होता.
एस श्रीसंतने सामन्यानंतर शेअर केलेल्या व्हिडीओत गौतमवर बरेच गंभीर आरोप केले होते. या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी गौतम गंभीरने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. गौतमने एक्स अॅपवर पोस्ट शेअर करताना लिहले की, ज्यामध्ये तो टीम इंडियाच्या जर्सीमध्ये आहे आणि हसत आहे. गंभीर भारतीय संघात खेळत असतानाचा हा फोटो आहे. त्याने त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले, ‘जेव्हा लोक फक्त जगात लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत असतात, तेव्हा फक्त हसत रहा.’
हेही वाचा – LLC 2023 : ‘तो मला फिक्सर-फिक्सर…’, नवीन व्हिडीओमध्ये श्रीसंतने गौतमवर केले गंभीर आरोप, पाहा VIDEO
गौतम गंभीरने शेअर केलेल्या या पोस्टवर आता श्रीसंतने कमेंट केली आहे. त्याने कमेंटमध्ये लिहिले की, “तू खेळाडू आणि भावाच्या मर्यादा ओलांडल्या आहेत.” तू लोकांचे प्रतिनिधित्व करतो. तरीही तू प्रत्येक क्रिकेटपटूसोबत वादात अडकतो. आमचं काय चुकलं? मी फक्त हसून पाहिलं. तू मला फिक्सर म्हणाला? खरंच? तू सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठा आहेस का? तुला असे बोलण्याचा आणि वाटेल तसे वागण्याचा अधिकार नाही. तू पंचांना शिवीगाळही केलीस आणि तरीही तू हसण्याबद्दल बोलत आहेस?”
मी तुझा आदर करत होतो : एस श्रीसंत
श्रीसंतने पुढे लिहिले की, “तू अहंकारी आहेस.” तुझ्या मनात समर्थन करणाऱ्यांबद्दल कसलाही आदर नाही. कालपर्यंत मला तुझ्याबद्दल आणि तुझ्या कुटुंबाबद्दल आदर होता. तू फिक्सर हा अपमानजनक शब्द फक्त एकदाच नाही, तर सात किंवा आठ वेळा वापरला आहे. मला सतत भडकवण्याचा प्रयत्न केला. माझ्याप्रमाणे ज्यांनी हे अनुभवले आहे, ते तुला कधीही माफ करणार नाहीत. तू काय बोललात आणि काय चुकीचे केले हे तुला माहीत आहे. मला खात्री आहे की देव सुद्धा तुला माफ करणार नाही. देव सर्व काही पाहत आहे.”