ENG vs SA Highlights in Marathi: दक्षिण आफ्रिकेने आपली दमदार कामगिरी सुरू ठेवत चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या उपांत्य फेरीत सहज प्रवेश केला आहे. गट टप्प्यातील आपल्या शेवटच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडचा एकतर्फी सामन्यात ७ गडी राखून आणि १२५ चेंडू राखून पराभव केला आणि अंतिम चारमध्ये आपले स्थान निश्चित केले. सामना संपण्यापूर्वीच दक्षिण आफ्रिकेने उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्रता मिळवली होती, मात्र या विजयासह त्यांनी ब गटात पहिले स्थान मिळवले. तर इंग्लंडचा संघ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एकाही सामन्यात न विजय मिळवता माघारी जाणार आहे.
इंग्लंड संघाप्रमाणेच पाकिस्तानचा संघही चॅम्पियन्स ट्रॉफीत एकही सामना जिंकू शकला नव्हता. इंग्लंडचा संघ गट टप्प्यातील तिन्ही सामन्यात पराभूत झाला. तर पाकिस्तानने दोन सामने गमावले आणि एक सामना पावसामुळे रद्द झाला. तर बांगलादेशचा संघही चॅम्पियन्स ट्रॉफीत एकही सामना न जिंकता बाहेर पडला.
कराचीच्या नॅशनल स्टेडियमवर शनिवारी १ मार्च रोजी खेळला जाणारा हा सामना दुसरा उपांत्य फेरीतील संघ ठरवण्यासाठी खेळवला गेला. पण दक्षिण आफ्रिकेचे उपांत्य फेरी गाठणे जवळपास निश्चित झाले होते. अफगाणिस्तानला उपांत्य फेरी गाठण्यासाठी इंग्लंडला दक्षिण आफ्रिकेवर मोठा विजय आवश्यक होता. पण दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात आपल्या गोलंदाजीच्या जोरावर ही शक्यता संपुष्टात आणली आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यानंतर संघाच्या फलंदाजांनी दमदार फलंदाजी करत सहज लक्ष्य गाठले.
इंग्लंड संघाचा कर्णधार जोस बटलर याने इंग्लंडची वनडे क्रिकेटमधील कामगिरी पाहता वनडे संघाचा कर्णधार म्हणून राजीनामा दिला. दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत त्याने हा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेच्या संघाविरूद्धचा त्याचा वनडे संघाचा कर्णधार म्हणून हा अखेरचा सामना होता, पण या सामन्यात लाजिरवाण्या पद्धतीने संघ पराभूत झाला.
इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला पण हा निर्णय अगदी चुकीचा ठरला. इंग्लंड संघ आफ्रिकेच्या भेदक गोलंदाजीसमोर फार काळ टिकू शकला नाही. संघातील एकही खेळाडू ४० धावाही करण्यात अपयशी ठरला. जो रूटने सर्वाधिक ३७ धावांची खेळी केली. तर इतर सर्व फलंदाज २०-२५ धावा करत बाद झाले आणि परिणामी संघ १७९ धावांमध्ये सर्वबाद झाला. आफ्रिकेकडून मार्को यान्सन आणि वियान मुल्डर यांनी प्रत्येकी ३ विकेट घेतले. तर केशव महाराज २ विकेट आणि एनगिडी-रबाडाने प्रत्येकी १ विकेट घेतली.
इंग्लंडच्या संघाने दिलेल्या १८० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेने अवघ्या २९ षटकांत विजय मिळवला. रायन रिकल्टनने २५ चेंडूत २७ धावा केल्या, तर ट्रिस्टन स्टब्स खातेही न उघडता आर्चरच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाला. यानंतर रॅसी व्हॅन डेर ड्युसेनने ३ षटकार आणि ६ चौकारांसह सर्वाधिक ७२ धावांची खेळी केली. तर दुखापतीतून परतलेल्या हेनरिक क्लासेनने ५६ चेंडूत ११ चौकारांसह ६४ धावांची खेळी करत संघाचा विजय निश्चित केला. तर डेव्हिड मिलरने विजयी षटकार लगावत संघाला मोठा विजय मिळवून दिला.