South Africa vs Afghanistan ICC Cricket World Cup 2023 Match Updates: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज एकदिवसीय विश्वचषक २०२३ या स्पर्धेतील ४२वा सामना खेळला जात आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान आमनेसामने आहेत. अफगाणिस्तानने सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तान संघाने ५० षटकांत सर्वबाद २४४ धावा केल्या आहेत. आता दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी २४५ धावांचे लक्ष्य मिळाले आहेत.
अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना अजमतुल्ला उमरझाईच्या नाबाद ९७ धावांच्या खेळीच्या जोरावर ५० षटकांत सर्वबाद २४४ धावा केल्या. अजमतुल्ला उमरझाईने १०७ चेंडूत नाबाद ९७ धावा केल्या. या खेळीत त्याने सात चौकार आणि तीन षटकार मारले.रहमत शाह आणि नूर अहमद यांनी प्रत्येकी २६ धावांचे योगदान दिले. रहमानउल्ला गुरबाजने २५ धावा केल्या.
दक्षिण आफ्रिकेकडून गोलंदाजी करताना जेराल्ड कोएत्झीने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर लुंगी एनगिडी आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. फेहलुकवायोने एक विकेट घेतली. दोन्ही संघांसाठी हा सामना फारसा महत्त्वाचा नाही. दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरी गाठली आहे. त्याचवेळी अफगाणिस्तानसाठी उपांत्य फेरीचे दरवाजे बंद झाले आहेत. उपांत्य फेरी गाठण्यासाठी या संघाला हा सामना ४३८ धावांनी जिंकावा लागणार होता, मात्र या संघाला एवढी मोठी धावसंख्या उभारता आली नाही.
उपांत्य फेरीसाठी तीन संघ झाले निश्चित –
आतापर्यंत तीन संघ २०२३ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले आहेत. सर्वप्रथम यजमान भारताने एकही सामना न गमावता उपांत्य फेरीत धडक मारली होती. यानंतर दक्षिण आफ्रिकेने पात्रता मिळवली. त्यानंतर पाच वेळा विश्वविजेता असलेला ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणारा तिसरा संघ ठरला. न्यूझीलंडने चौथ्या उपांत्य फेरीतील स्थान जवळपास निश्चित केले आहे. पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यानंतर न्यूझीलंडला उपांत्य फेरीतील स्थान निश्चित होईल.