South Africa vs Australia ODI Series Updates: सध्या दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली जात आहे. दरम्यान दक्षिण आफ्रिका संघाच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. २०२३ च्या विश्वचषकापूर्वी कर्णधार टेंबा बावुमासह संघाचे दोन खेळाडू जखमी झाले आहेत. वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्खिया या दुखापतीमुळे तिसरा एकदिवसीय सामना खेळू शकला नाही, आता तो शेवटच्या दोन एकदिवसीय सामन्यांमधूनही बाहेर आहे.
पाठीच्या दुखापतीमुळे नॉर्खिया ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील उर्वरित सामन्यांमधून बाहेर पडला आहे. नॉर्खियाच्या दुखापतीमुळे विश्वचषकापूर्वी दक्षिण आफ्रिकेसाठी अडचणी निर्माण होऊ शकतात. त्याचवेळी जबरदस्त फॉर्मात असलेला आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमा देखील ताणामुळे मालिकेतील शेवटचा सामना खेळू शकणार नाही. बावुमाच्या जागी एडेन मार्कराम उर्वरित दोन सामन्यांमध्ये आफ्रिकेची जबाबदारी सांभाळेल.
वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्खियाच्या दुखापतीबाबत, क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने एक निवेदन जारी केले की, “आफ्रिकन वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्खिया पाठीच्या दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उर्वरित दोन एकदिवसीय सामन्यांमधून बाहेर पडला आहे. २९ वर्षीय नॉर्खियाने स्कॅन केले आणि तज्ञांचा सल्ला घेतला आणि या आठवड्याच्या अखेरीस प्रोटीज वैद्यकीय संघाच्या देखरेखीखाली गोलंदाजी पुन्हा सुरू करेल.”
याशिवाय कर्णधार बावुमाच्या दुखापतीवर क्रिकेट दक्षिण आफ्रिकेकडून एक निवेदन जारी करण्यात आले आहे. कर्णधार किरकोळ जखमी झाला आहे. निवेदनात म्हटले आहे की, “एकदिवसीय कर्णधार टेंबा बावुमा शुक्रवारी सुपरस्पोर्ट पार्क येथे होणाऱ्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात निवडीसाठी उपलब्ध असणार नाही. बावुमाच्या उजव्या हाताला दुखापत झाली असून खबरदारी म्हणून त्याला सामन्यातून बाहेर ठेवण्यात आले आहे.”
दक्षिण आफ्रिका वनडे मालिकेत पिछाडीवर –
आत्तापर्यंत खेळल्या गेलेल्या ३ वनडे सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलिया २ विजयांसह २-१ ने आघाडीवर आहे. ऑस्ट्रेलियाने पहिले दोन सामने जिंकले होते. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने मालिकेतील आघाडी कायम राखत १११ धावांनी शानदार विजय संपादन केला.