South Africa vs Bangladesh, World Cup 2023: दक्षिण आफ्रिकेच्या त्सुनामीत बांगलादेश वाहून गेले असे म्हटले तर वावगं ठरणार नाही. एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या २३व्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने बांगला टायगर्सचा १४९ धावांनी दारूण पराभव केला आहे. या विजयासह आफ्रिकेचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचला असून उपांत्य फेरीतील आपला दावा मजबूत केला आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत ३८२ धावा केल्या. क्विंटन डी कॉक याने झळकावलेल्या १७४ धावा व हेन्रिक क्लासेन याच्या तुफानी ९० धावांच्या जोरावर त्यांनी हे आव्हान ठेवले. मात्र या संपूर्ण विश्वचषकातच आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेचा संघ शेवटच्या १० षटकांमध्ये अत्यंत जबरदस्त फटकेबाजी करताना दिसला आहे. प्रत्युत्तरात बांगलादेशला केवळ २३३ धावा करता आल्या.
दक्षिण आफ्रिकेने गुणतालिकेत पटकावले दुसरे स्थान
दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशचा १४९ धावांनी पराभव केला आहे. या स्पर्धेतील दक्षिण आफ्रिकेचा हा चौथा विजय आहे. या सामन्यातील विजयासह आफ्रिकेचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आला आहे. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ५ गडी गमावून ३८२ धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ ४६.४ षटकात केवळ २३३ धावा करू शकला आणि १४९ धावांनी सामना गमावला. बांगलादेशकडून महमुदुल्लाह रियादने १११ धावांची खेळी केली, मात्र त्याची खेळी संघाला उपयोगी पडू शकली नाही. दक्षिण आफ्रिकेकडून क्विंटन डी कॉकने १७४ आणि हेनरिक क्लासेनने ९० धावा केल्या. कर्णधार मार्करामने ६० धावांचे योगदान दिले.
विश्वचषकात सर्वाधिक शतके
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉकने १४० चेंडूत १७४ धावा केल्या आणि अनेक विक्रम आपल्या नावावर केले. विश्वचषकात तीन शतके झळकावणारा तो पहिला दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक आहे. या बाबतीत कुमार संगकारा चार शतकांसह आघाडीवर आहे. डी कॉक तीन शतकांसह दुसऱ्या स्थानावर आहे. एबी डिव्हिलियर्स आणि दोन शतके झळकावणारा झिम्बाब्वेचा ब्रेंडन टेलर दुसऱ्या स्थानावर आहे. डी कॉकच्या नावावर एक अनोखा विक्रम आहे. जेव्हा जेव्हा त्याने भारतात ५० हून अधिक धावा केल्या आहेत, तेव्हा त्याचे शतकात रूपांतर करण्यात तो यशस्वी ठरला आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्यांनी आपल्या शेवटच्या दहा षटकांमध्ये १३७ धावांचा डोंगर उभारला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध देखील त्यांनी ७९ धावा काढल्या. इंग्लंडविरुद्धच्या मागील सामन्यात त्यांनी गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत तब्बल १४३ धावा जोडल्या होत्या. त्यानंतर आता या सामन्यातही त्यांनी तशीच कामगिरी करून दाखवली. या सामन्यातील पहिल्या डावाचा विचार केल्यास डी कॉक याने १७४ धावांची कारकीर्दीतील सर्वोत्तम खेळी केली. कर्णधार एडन मार्करमने ६० व क्लासेनने ९० धावांचे योगदान दिले. या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेने चौथ्यांदा ३०० पेक्षा जास्त धावासंख्या उभारली आहे.
महमुदुल्लाहचे शतक व्यर्थ
महमुदुल्लाह रियादने १०४ चेंडूत आपले शतक पूर्ण केले आहे. त्याचे हे शानदार शतक देखील बांगलादेशला मोठ्या पराभवापासून वाचवू शकले नाही. बांगलादेशला हा सामना जिंकणे जवळपास अशक्य होते, मात्र महमुदुल्लाहने एकाकी झुंज दिली. महमुदुल्लाह रियाद १११ चेंडूत १११ धावा करून बाद झाला आहे. गेराल्ड कोटझेने त्याला मार्को जॅनसेनकरवी झेलबाद केले.