South Africa vs Bangladesh, World Cup: दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश या दोन संघांमध्ये विश्वचषक २०२३ स्पर्धेतील २३वा सामना मुंबई येथील वानखेडे स्टेडिअम येथे सुरु आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करम याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय क्विंटन डेकॉक आणि हेनरिक क्लासेन यांनी सार्थ ठरवत दोघांनी तुफानी खेळी केली. खराब सुरुवातीनंतर सलामीवीर क्विंटन डी कॉक याने आपला शानदार फॉर्म कायम राखला. त्याने या फॉर्मचा फायदा उठवत स्पर्धेतील आपले तिसरे शतक पूर्ण केले मात्र, त्याचे द्विशतक हुकले त्याने १७४ धावा केल्या. त्याच्या या खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशसमोर ३८३ धावांचे अवघड असे लक्ष्य ठेवले आहे.
एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या २३व्या सामन्यात आज दक्षिण आफ्रिकेचा सामना बांगलादेशशी होत आहे. आफ्रिकेचा संघ सध्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे, तर बांगलादेशचा संघ सातव्या स्थानावर आहे. बांगलादेश संघ हा सामना जिंकून गुणतालिकेत आपले स्थान सुधारू इच्छितो, तर दक्षिण आफ्रिका संघ उपांत्य फेरीतील आपला दावा मजबूत करू इच्छितो. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशसमोर ठेवले ३८३ धावांचे आव्हान
दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशसमोर ३८३ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या आफ्रिकन संघाची सुरुवात खराब झाली. रीझ हेंड्रिक्स १२ धावा करून बाद झाला तर रॅसी व्हॅन डर डुसेन एक धावा काढून बाद झाला. हेंड्रिक्सला शॉरीफुल आणि ड्यूकसने मिराजने बाद केले. यानंतर क्विंटन डी कॉकने कर्णधार एडन मार्करामसोबत तिसऱ्या विकेटसाठी १३१ धावांची भागीदारी केली. डी कॉकने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील २०वे शतक आणि या विश्वचषकातील तिसरे शतक झळकावले. त्याचवेळी, मार्करामने आपल्या वन डे कारकिर्दीतील नववे अर्धशतक झळकावले. ही भागीदारी शाकिबने तोडली.
मार्कराम ६९ चेंडूंत सात चौकारांच्या मदतीने ६० धावा करून बाद झाला. त्याचवेळी, आपल्या १५०व्या एकदिवसीय सामन्यात, डी कॉकने १४० चेंडूत १५ चौकार आणि सात षटकारांच्या मदतीने १७४ धावांची खेळी केली. या विश्वचषकातील ही त्याची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. यापूर्वी हा विक्रम डेव्हिड वॉर्नरच्या नावावर होता. त्याने पाकिस्तानविरुद्ध १६३ धावांची इनिंग खेळली होती. यानंतर हेनरिक क्लासेनने ३४ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. क्लासेन आणि डी कॉकमध्ये १४१ धावांची भागीदारी झाली. क्लासेनने ४९ चेंडूंत दोन चौकार आणि आठ षटकारांच्या मदतीने ९० धावांची खेळी केली. मात्र, मोठा फटका मारण्याच्या नादात त्याचे शतक हुकले. डेव्हिड मिलरने १५ चेंडूत एक चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने ३४ धावा केल्या तो आणि मार्को जॅनसेन शेवटपर्यंत नाबाद राहिले. डी कॉकने या स्पर्धेत चांगली सुरुवात करताना पहिल्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध व दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक झळकावलेले. यापूर्वीच त्याने जाहीर केले आहे की, या विश्वचषकानंतर तो वन डे क्रिकेटमधून निवृत्त होईल.
दोन्ही संघांची प्लेईंग-११
बांगलादेश: तनजीद हसन, लिटन दास, नझमुल हुसेन शांतो, शाकिब अल हसन (कर्णधार), मेहदी हसन मिराज, मुशफिकुर रहीम (यष्टीरक्षक), महमुदुल्लाह, नसुम अहमद, मुस्तफिजुर रहमान, शोरीफुल इस्लाम, हसन महमूद.
दक्षिण आफ्रिका: क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रीझा हेंड्रिक्स, रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, कागिसो रबाडा, लिझार्ड विल्यम्स.