India vs South Africa Team India Squad: दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. गुरुवारी बीसीसीआयचे सचिव जय शाह, मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांची दिल्लीत बैठक झाली आणि पुढील रोडमॅप तयार करण्यात आला. या दौऱ्यासाठी निवडकर्त्यांनी अनेक आश्चर्यकारक निर्णय घेतले आणि तीन फॉरमॅटसाठी तीन वेगवेगळ्या कर्णधारांची नियुक्ती केली. सूर्यकुमार टी-२० मध्ये कर्णधारपद भूषवताना दिसणार आहे, तर के.एल. राहुल एकदिवसीय सामन्यात आणि रोहित शर्मा कसोटीत नेतृत्व सांभाळणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टी-२० मध्ये, बहुतेक खेळाडू असे आहेत जे सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत खेळत आहेत. त्या संघात फक्त रवींद्र जडेजाचा समावेश करण्यात आला आहे. त्याच वेळी, एकदिवसीय संघ पूर्णपणे बदलला आहे आणि त्या संघात फक्त तीन खेळाडू (श्रेयस अय्यर, राहुल आणि कुलदीप) आहेत जे एकदिवसीय विश्वचषक २०२३ खेळले आहेत. सलामीवीरांपासून गोलंदाजांपर्यंत पूर्णपणे नवीन संघ आहे. त्याचबरोबर कसोटी संघात फारसा बदल झालेला नाही, पण काही मोठे निर्णय नक्कीच घेतले गेले आहेत. अजिंक्य रहाणेला संघातून वगळण्यात आले, तर चेतेश्वर पुजाराला देखील डच्चू देण्यात आला आहे.

हेही वाचा: द. आफ्रिका दौऱ्यातही विराट, रोहितला विश्रांती; एकदिवसीय संघाची धुरा के. एल. राहुलकडे, टी-२०चे नेतृत्व सूर्यकुमारकडे

रहाणे गेल्या दौऱ्यात उपकर्णधार होता

भारताने शेवटची कसोटी मालिका जुलै महिन्यात वेस्ट इंडिजमध्ये खेळली होती. त्यानंतर टीम इंडिया दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी कॅरेबियन देशात पोहोचली. रहाणे त्या दौऱ्यात टीम इंडियाचा उपकर्णधार होता. सुमारे दीड वर्ष टीम इंडियाच्या बाहेर राहिल्यानंतर रहाणेने यंदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी पुनरागमन केले. ११ जानेवारी २०२२ रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी खेळल्यानंतर, त्या दौऱ्यातील खराब कामगिरीमुळे त्याला कसोटी संघातून वगळण्यात आले. आयपीएल २०२३मधील चमकदार कामगिरीनंतर रहाणेने पुन्हा संघात आपले स्थान निर्माण केले. त्याने फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८९ आणि ४६ धावांची इनिंग खेळली होती. यानंतर त्याला वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी उपकर्णधार बनवण्यात आले. मात्र, कॅरेबियन दौऱ्यावर त्याला दोन कसोटी सामन्यांच्या दोन डावात केवळ ११ धावा करता आल्या आणि आता त्याला वगळण्यात आले आहे.

रहाणेची कसोटी कारकीर्द

रहाणेने आतापर्यंत ८५ कसोटी सामन्यांच्या १४४ डावांमध्ये ३८.४६च्या सरासरीने ५०७७ धावा केल्या आहेत. यामध्ये १२ शतके आणि २६ अर्धशतकांचा समावेश आहे. ३५ वर्षीय रहाणेला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दौऱ्यातून वगळण्याचा अर्थ असा आहे की, निवडकर्ते आता नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा विचार करत आहे. ते टीम इंडियाच्या भविष्यातील योजनांमध्ये त्यांचा विचार करत नाहीत. रहाणेच्या वेस्ट इंडीज दौऱ्याच्या पुनरागमनामागे श्रेयस अय्यर आणि के.एल. राहुल जखमी झाले असल्याने त्याची निवड केली होती. त्यामुळे पाचव्या क्रमांकावर रहाणे हा सर्वोत्तम पर्याय होता. आता श्रेयस आणि राहुलच्या पुनरागमनानंतर रहाणेला वगळण्यात आले आहे. हे दोघेही तंदुरुस्त राहिल्यास रहाणेच्या पुनरागमनाची शक्यता फारच कमी आहे. त्याचवेळी रहाणेने यावर्षी तीन कसोटी सामन्यांच्या चार डावात फक्त १४६ धावाच करू शकला.

हेही वाचा: “मी अद्याप करारावर…”, BCCIने कार्यकाळ वाढवण्याच्या घोषणेवर द्रविडचे बुचकळ्यात टाकणारे वक्तव्य

पुजारासाठी टीम इंडियाचा रस्ता बंद?

३५ वर्षीय पुजाराच्या पुनरागमनाची शक्यता फारच कमी आहे. यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल आणि ऋतुराज गायकवाड यांच्या निवडीमुळे टीम इंडिया आता पुजाराकडे पाहणार नाही हे निश्चित. वेस्ट इंडिज दौऱ्यातही यशस्वी जैस्वालने कर्णधार रोहितबरोबर सलामीला फलंदाजी केली होती आणि अनेक उत्कृष्ट खेळी खेळल्या होत्या. हे दोघं दक्षिण आफ्रिकेतही सलामीवीर म्हणून खेळण्याची शक्यता आहे. त्याचवेळी, तिसऱ्या क्रमांकावर, जे पुजाराचे फलंदाजीचे स्थान आहे त्याजागी शुबमन गिल किंवा ऋतुराज गायकवाड यापैकी एकाला संधी मिळू शकते. पुजारा शेवटचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना या वर्षी जूनमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. त्यात त्याने दोन डावात १४ आणि २७ धावांची खेळी केली. तेव्हापासून तो कसोटी संघातून बाहेर आहे. पुजाराने यावर्षी पाच कसोटी सामन्यांच्या आठ डावात २५.८५च्या सरासरीने १८१ धावा केल्या.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sa vs ind cheteshwar pujara ajinkya rahanes career is over bcci new face will get a chance avw