SA vs IRE 2nd T20 Ireland beat South Africa by 10 runs : दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघासमोरील संकटे कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. टी-२० विश्वचषक २०२४ च्या फायनलमध्ये टीम इंडियाकडून झालेल्या पराभवामुळे त्यांचे मनोबल पूर्णपणे खचले आहे. विश्वचषक संपल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजविरुद्ध टी-२० मालिका खेळली. जिथे त्यांना ३-० असा पराभव स्वीकारावा लागला. यानंतर एकदिवसीय मालिकेत अफगाणिस्तानने २-१ ने पराभूत केले. अफगाणिस्ताननंतर आता त्यांना आणखी एका छोट्या संघाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला आहे. हा संघ दुसरा कोणी नसून आयरिश संघ आहे. आयर्लंडने टी-२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाचा १० धावांनी धुव्वा उडवला.
आयर्लंडचा दक्षिण आफ्रिकेवर ऐतिहासिक विजय –
यूएईमध्ये दक्षिण आफ्रिका आणि आयर्लंड यांच्यात टी-२० मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकला होता. मात्र, आयर्लंडने दुसरा सामना जिंकून मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. या सामन्यात आयर्लंडने दक्षिण आफ्रिकेचा १० धावांनी पराभव केला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर आयर्लंडने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ गडी गमावून १९५ धावा केल्या होत्या. त्यामुळे हा सामना अतिशय रोमांचक होणार आहे, हे सामन्याच्या पहिल्या डावातच स्पष्ट झाले होते. तसेच १९६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने २० षटकात ९ गडी गमावून १८५ धावा केल्या आणि आयर्लंडने सामना जिंकून इतिहास रचला.
आयर्लंडच्या विजयात या खेळाडूंनी बजावली महत्त्वाची भूमिका –
या सामन्यात दोन आयरिश फलंदाजांची शानदार कामगिरी पाहायला मिळाली. आयर्लंडकडून फलंदाजी करताना रॉस अडायरने शानदार शतक झळकावले. रॉस अडायरने ५९ चेंडूत १०० धावा केल्या. आपल्या खेळीदरम्यान त्याने ५ चौकार आणि ९ शानदार षटकार मारले. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अडायरचे हे पहिले शतक आहे. याशिवाय पॉल स्टर्लिंगने फलंदाजीतही चमकदार कामगिरी केली.
हेही वाचा – IPL 2025 : ‘हार्दिकला रिलीज करुन ‘या’ तीन खेळाडूंना रिटेन करा…’; अजय जडेजाचा मुंबई इंडियन्सला सल्ला
त्याने ३१ चेंडूत ५१ धावांची खेळी खेळली. पॉलने आपल्या खेळीत ७ चौकार आणि १ षटकार मारला. आयर्लंडला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला विजय मिळवून देण्यात या दोन फलंदाजांनी महत्त्वाची भूमिका बजावली. दक्षिण आफ्रिकेकडून फलंदाजी करताना रीझा हेंड्रिक्सने ३२ चेंडूत ५१ धावा आणि मॅथ्यू ब्रिट्झकेने ४१ चेंडूत ५१ धावा केल्या. आयर्लंडच्या वतीने मार्क अडायरने अप्रतिम गोलंदाजी केली. त्याने ४ षटकात ३१ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. तसेच ग्रॅहम ह्यूमने ४ षटकात २५ धावा देत ३ विकेट्स घेतल्या.
हेही वाचा – इरफान पठाणने IPL 2025 च्या ‘या’ नियमाबद्दल BCCI चे केले कौतुक; म्हणाला, ‘मी गेल्या दोन वर्षांपासून…’
आयर्लंड-दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हेड टू हेड रेकॉर्ड –
विशेष म्हणजे आयर्लंड संघाचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला ऐतिहासिक विजय आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत ७ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. जिथे आयर्लंडने प्रथमच दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आहे. याआधी झालेल्या सहा टी-२० सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेचा वरचष्मा होता. दक्षिण आफ्रिकेने सर्व सहा सामने जिंकले होते, मात्र आता हा आकडा ६-१ असा झाला आहे. या दोन सामन्यांच्या टी-२० मालिकेनंतर आता तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका होणार आहे. एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना २ ऑक्टोबर रोजी अबुधाबी येथे होणार आहे.