South Africa vs Netherlands ICC Cricket World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषकाच्या १५व्या सामन्यात आज दक्षिण आफ्रिकेचा सामना नेदरलँडशी होत आहे. धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. नेदरलँड संघाने शेवटचे दोन्ही सामने गमावले आहेत, तर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने शेवटचे दोन्ही सामने जिंकले आहेत. दक्षिण आफ्रिकेचे कर्णधार टेम्बा बावुमा तर नेदरलँड्सचे नेतृत्व स्कॉट एडवर्ड्सकडे आहे. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या दक्षिण आफ्रिकेने प्रतिस्पर्धी संघांसाठी धोक्याची घंटा वाजवली असून मंगळवारी नेदरलँड्सवर शानदार विजय नोंदवून आपले स्थान आणखी मजबूत करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. गेल्या दोन सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेने दाखवून दिले की त्यांचा संघ आता ‘चोकर्स’ (दडपणाला बळी पडून) हा टॅग काढून टाकण्यासाठी सज्ज आहे.
दक्षिण आफ्रिकेचा संघ जबरदस्त फॉर्मात आहे
दिल्लीत झालेल्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेविरुद्ध पाच विकेट्सच्या मोबदल्यात ४२८ धावांची विक्रमी धावसंख्या केल्यानंतर १०२ धावांनी विजय मिळवला होता. यानंतर लखनऊमध्ये पाचवेळच्या चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे संघ त्यांच्या क्षमतेनुसार खेळत नसताना दक्षिण आफ्रिकेने प्रत्येक विभागात सरस कामगिरी करून दाखवली आहे. यष्टिरक्षक-फलंदाज क्विंटन डी कॉक, अव्वल फळीतील फलंदाज रॅसी व्हॅन डर डुसेन आणि एडन मार्कराम यांनी सर्वांना प्रभावित केले आहे.
तिघांनीही श्रीलंकेविरुद्ध शतके झळकावली, तर हेनरिक क्लासेन आणि डेव्हिड मिलर यांनीही उपयुक्त खेळी खेळल्या. श्रीलंकेच्या फलंदाजांविरुद्ध त्यांचे गोलंदाज तितकेसे प्रभावी नव्हते, पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पुढच्या सामन्यात त्यांनी शानदार पुनरागमन केले. डी कॉकने सलग दुसरे शतक झळकावले, तर मार्को जेन्सन आणि कागिसो रबाडा यांनी गोलंदाजीत प्रभावी कामगिरी केली. दक्षिण आफ्रिकेने हा सामना १७७ धावांनी जिंकला.
२०२२ मध्ये नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून अस्वस्थता निर्माण केली होती
२०२२च्या टी२० विश्वचषकात नेदरलँड्सविरुद्धच्या पराभवाचा बदला घेऊन मोठ्या फरकाने विजय मिळवण्याकडे दक्षिण आफ्रिकेचे लक्ष असेल. टी२० विश्वचषक २००९ मध्ये लॉर्ड्सवर इंग्लंडचा पराभव करून नेदरलँड्सने अस्वस्थता निर्माण केली होती. यानंतर, २०२२ टी२० विश्वचषकाच्या सुपर-१२ फेरीत, नेदरलँड्सने टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा पराभव केला आणि त्यांना विश्वचषकातून बाहेर काढले होते. याचा फायदा पाकिस्तानी संघाला झाला आणि संघाने उपांत्य फेरी गाठली. स्कॉट एडवर्ड्सच्या नेतृत्वाखालील संघाला त्या विजयापासून प्रेरणा घ्यायची आहे, परंतु टी२० आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये फरक आहे. बरं, क्रिकेटमध्ये चमत्कार घडतात आणि रविवारी दिल्लीत अफगाणिस्तानने विद्यमान चॅम्पियन इंग्लंडला पराभूत करून याची झलक दिली. अशा स्थितीत नेदरलँड्सला आणखी एका अशाच विजयाची आशा आहे.
दोन्ही संघ पुढीलप्रमाणे आहेत
नेदरलँड्स: विक्रमजीत सिंग, मॅक्स ओ’डॉड, कॉलिन अकरमन, बास डी लीडे, तेजा निदामानुरु, स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), सायब्रँड एंजेलब्रेक्ट, रॉल्फ व्हॅन डर मर्वे, लोगन व्हॅन बीक, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकरेन.
दक्षिण आफ्रिका: क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), टेम्बा बावुमा (कर्णधार), रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, कागिसो रबाडा, केशव महाराज, लुंगी एनगिडी, जेराल्ड कोएत्झी.