SA vs PAK Corbin Bosch highest score at number 9 in test cricket history : दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात असा पराक्रम घडला, ज्याने कसोटी क्रिकेटचा इतिहासच बदलून टाकला. पाकिस्तानचा पहिला डाव अवघ्या २११ धावांत आटोपला होता. यानंतर प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने ३०१ धावा करत पहिल्या डावात ९० धावांची आघाडी घेतली. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेसाठी कसोटी पदार्पण करणाऱ्या कॉर्बिन बॉशने इतिहास घडवला आहे.
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा पाकिस्तानने दुसऱ्या डावात ८८ धावांच्या स्कोअरवर ३ विकेट्स गमावल्या होत्या आणि आता २ धावांनी पिछाडीवर आहे. पाकिस्तान संघाच्या खराब फलंदाजीपेक्षा आफ्रिकेसाठी कसोटी पदार्पण करणाऱ्या कॉर्बिन बॉस्कचीच अधिक चर्चा झाली, ज्याने फलंदाजीत ८१ धावांचे योगदान दिले आणि पहिल्या डावात ४ विकेट्स घेतल्या.या सामन्यात एकेकाळी दक्षिण आफ्रिकन संघ २१३ धावांवर ८ विकेट्स गमावून बसला होता. मात्र, कॉर्बिन बॉशच्या शानदार खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकन संघ ३०० धावांचा टप्पा पार करण्यात यशस्वी ठरला.
पदार्पणवीर कॉर्बिन बॉशने केला कहर –
पदार्पणवीर कॉर्बिन बॉश नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि ८१ धावा करून नाबाद परतला. कॉर्बिन बॉश आता आठव्या किंवा त्या खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक धावा करणारा दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज ठरला आहे. या बाबतीत त्याने १२२ वर्ष जुना विक्रम मोडला आहे. तसेच कसोटी क्रिकेटच्या १४७ वर्षांच्या इतिहासात, बॉश नवव्या क्रमांकावर फलंदाजी करताना पदार्पणात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. याशिवाय, त्याने पहिला दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू होण्याचा बहुमान पटकावला आहे, ज्याने पदार्पणातच केवळ ८१ धावाच नाही तर ४ विकेट्स घेतल्या आहेत. बॉस्कने ८१ धावांच्या खेळीत १५ चौकार मारले होते.
हेही वाचा – IND vs AUS : यशस्वी जैस्वालचा मोठा पराक्रम! मोडला २२ वर्षांपूर्वीचा सचिन तेंडुलकरचा खास विक्रम
एका वर्षात दुसऱ्यांदा मोडला विश्वविक्रम-
कॉर्बिन बॉशने मार्करम, रबाडा आणि नंतर पीटरसनसोबत छोट्या भागीदारी करत ८१ धावा करून नाबाद परतला. अशाप्रकारे त्याने पदार्पणाच्या कसोटीत नवव्या क्रमांकावर सर्वात मोठी खेळी खेळण्याचा विश्वविक्रम केला. यापूर्वी हा मोठा विक्रम श्रीलंकेच्या मिलन रत्नायकेच्या नावावर होता. मिलनने या वर्षी इंग्लंडविरुद्धच्या पदार्पणाच्या कसोटीत नवव्या क्रमांकावर ७२ धावांची इनिंग खेळली होती. या इनिंगच्या जोरावर लंकन खेळाडूने बलविंदर सिंग संधूचा विक्रम मोडला होता. आता कॉर्बिन बॉशने मिलन रत्नायकेचा विक्रम मोडीत काढत खळबळ उडवून दिली आहे.
पदार्पणाच्या कसोटीत ९व्या क्रमांकावर सर्वात मोठी खेळी खेळणारे फलंदाज :
८१* – कॉर्बिन बॉश विरुद्ध पाकिस्तान, २०२४
७२ – मिलन रत्नायके विरुद्ध इंग्लंड, २०२४
७१ – बलविंदर सिंग संधू विरुद्ध पाकिस्तान, १९८३
५९ – मोंडे जोंडेकी विरुद्ध इंग्लंड, २००३
५६* – विल्फ फर्ग्युसन विरुद्ध इंग्लंड, १९४८