SA vs PAK South Africa qualified World Test Championship Final 2025 : सेंच्युरियन कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानचा २ विकेट्सनी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. दक्षिण आफ्रिका अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. सुपरस्पोर्ट्स पार्क येथे खेळल्या गेलेल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेसमोर केवळ १४८ धावांचे छोटे लक्ष्य ठेवले होते. दक्षिण आफ्रिकेने १५० धावा करत सामना जिंकला. दक्षिण आफ्रिकेच्या या विजयात एडन मार्करम आणि रबाडा-यान्सन जोडीने महत्त्वाची भूमिका बजावली.
दक्षिण आफ्रिका WTC फायनलमध्ये दाखल –
सुपरस्पोर्ट्स पार्क येथे खेळल्या गेलेल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानने पहिल्या डावात २११ आणि दुसऱ्या डावात २३७ धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात ३०१ धावा आणि दुसऱ्या डावात १५० धावा करत सामना जिंकला. वेगवान गोलंदाजांना विकेटवरून मिळत असलेल्या मदतीमुळे यजमानांना माफक लक्ष्यही गाठतानाही संघर्ष करावा लागला. मात्र, शेवटी मार्को यान्सेन (२४ चेंडूत १६ धावा) आणि कागिसो रबाडा (२६ चेंडूत ३१ धावा) यांनी नवव्या विकेटसाठी ५० चेंडूत ५१ धावांची नाबाद भागीदारी करत दक्षिण आफ्रिकेला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.
दमदार फलंदाजीच्या जोरावर, दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना दोन गडी राखून जिंकला आणि आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिप २०२५ च्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. श्रीलंकेविरुद्ध घरच्या मैदानावर २-० अशी मालिका जिंकल्यानंतर प्रोटीज संघ आधीच डब्ल्यूटीसी गुणतालिकेत अव्वल स्थानावर होता. सध्याच्या हंगामात ११ कसोटी खेळलेल्या दक्षिण आफ्रिकेकडे ७ विजयांसह ६६.६७% पीसीटी आहे.
हेही वाचा – SA vs PAK : दक्षिण आफ्रिका WTC फायनलमध्ये; रबाडा-यान्सनच्या निर्णायक भागीदारीसह सेंच्युरियन कसोटीवर कब्जा
दक्षिण आफ्रिकेचा डब्ल्यूटीसी २०२५ च्या हंगामातील प्रवास –
सध्याच्या डब्ल्यूटीसीच्या हंगामातील दक्षिण आफ्रिकेचा प्रवास पाहिला तर त्याची सुरुवात घरच्या मैदानावर भारताविरुद्ध अनिर्णित मालिकेने झाली होती. यानंतर न्यूझीलंडविरुद्ध क्लीन स्वीपचा सामना करावा लागला. मात्र, विदेशात वेस्ट इंडिज आणि बांग्लादेशविरुद्ध दणदणीत विजय मिळवून प्रोटीज संघाने दमदार पुनरागमन केले. यानंतर घरच्या मैदानावरही चमकदार कामगिरी केली. टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखालील संघ पुढील वर्षी लॉर्ड्स येथे अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारा पहिला संघ ठरला. दक्षिण आफ्रिका संघाने फायनलचे प्रबळ दावेदार असलेले ऑस्ट्रेलिया, भारत आणि श्रीलंकेला मागे टाकत सर्वांना चकित केले. आता संपूर्ण क्रिकेटविश्वाला दुसऱ्या फायनलिस्ट कोण असणार याची उत्सुकता लागली आहे.