Durban Super Giants vs Sunrisers Eastern Cape Updates : दक्षिण आफ्रिका टी-२० लीगचा दुसरा हंगाम आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. स्पर्धेतील पहिल्या क्वालिफायर सामन्यात एडन मार्करमच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स इस्टर्न केप संघाने डरबन सुपर जायंट्सचा ५१ धावांनी पराभव केला. यासह मार्करमच्या संघाने सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली. गेल्या वर्षी सनरायझर्सने लीगचा पहिला हंगाम जिंकला होता. अशा प्रकारे काव्या मारनच्या संघाने सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीचे तिकीट पटकावले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मंगळवारी ६ फेब्रुवारी रोजी सनरायझर्स इस्टर्न केप आणि डर्बन सुपर जायंट्स यांच्यातील क्वालिफायर-१ सामना खेळला गेला. या सामन्यात सनरायझर्सने प्रथम फलंदाजी करताना ८ गडी गमावून १५७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात सुपर जायंट्स संघ १९.३ षटकांत केवळ १०६ धावांवरच मर्यादित राहिला. ओटनीएल बार्टमन हा सामनावीर ठरला. त्याने ४ षटकात फक्त १० धावा देत ४ विकेट्स घेतल्या. याशिवाय मार्को यान्सेनने ३.३ षटकात १६ धावा देत ४ विकेट्स घेतल्या.

सनरायझर्स इस्टर्न केपचा डाव –

सनरायझर्स इस्टर्न केपकडून इंग्लंडच्या डेव्हिड मलानने सर्वाधिक ६३ धावा केल्या. याशिवाय कर्णधार एडन मार्करमने ३० आणि सलामीवीर जॉर्डन हरमनने २१ धावा केल्या. उर्वरित फलंदाज अपयशी ठरले. ट्रिस्टन स्टब्स १४ धावा करून बाद झाला, तर पॅट्रिक क्रुगर ११ धावा करून बाद झाला. चार फलंदाजांना दुहेरी आकडा पार करता आला नाही. डर्बन सुपर जायंट्सकडून केशव महाराज आणि ज्युनियर डाला यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. नवीन उल हक आणि ड्वेन प्रिटोरियसने प्रत्येकी एक विकेट घेतली.

हेही वाचा – IND vs ENG : ”त्याने चांगली संधी गमावली…”, खराब फॉर्मशी झगडणाऱ्या श्रेयस अय्यरवर झहीर खान संतापला

डरबन सुपर जायंट्स डाव –

डरबन सुपर जायंट्सच्या फलंदाजीबद्दल बोलायचे झाले, तर विआन मुल्डरने ३८ धावा केल्या. हेनरिक क्लासेनने २३ आणि क्विंटन डी कॉकने २० धावा केल्या. सात फलंदाज दुहेरी आकडा पार करू शकले नाहीत. सलामीवीर मॅथ्यू ब्रित्झके ३ धावा करून बाद झाला तर टोनी डी जॉर्ज ३ धावा करून बाद झाला. जेजे स्मिट्स खाते खेळू शकले नाहीत. ड्वेन प्रिटोरियस सात धावा करून बाद झाले, केशव महाराज १, ज्युनियर डाला ३ आणि नवीन उल हक २ धावा करून बाद झाले. रीस टोपले खाते न उघडता नाबाद राहिला.

हेही वाचा – IND vs ENG : जसप्रीत बुमराहसमोर बेन स्टोक्स वारंवार का अपयशी ठरतोय? इंग्लंडच्या माजी कर्णधाराने सांगितले कारण

फायनल कधी आणि कुठे खेळवली जाणार?

दक्षिण आफ्रिका टी-२० लीग २०२४ चा अंतिम सामना १० फेब्रुवारी रोजी खेळवला जाईल. इस्टर्न केप क्वालिफायर-१ जिंकून सनरायझर्सने आधीच अंतिम फेरी गाठली आहे. अशा परिस्थितीत, आता एलिमिनेटर फेरी आणि क्वालिफायर-२ फायनलच्या आधी खेळले जातील, जिथे पार्ल रॉयल्स आणि जोहान्सबर्ग सुपर किंग्स यांच्यात ७ फेब्रुवारीला एलिमिनेटर खेळला जाईल, तर क्वालिफायर २ डर्बन सुपर जायंट्स आणि रॉयल यांच्यात होईल. एलिमिनेटर सामना जिंकणारा संघ. त्यानंतर क्वालिफायर-२ जिंकणारा संघ अंतिम फेरीत सनरायझर्सशी भिडणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sa20 qualifier 1 kavya maran sunrisers eastern cape in final beats lsg durban super giant vbm
Show comments