Saba Karim wants Jaiswal to continue opening with Gill : झिम्बाब्वेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत विजय मिळवल्यानंतर टीम इंडियाची नजर आता श्रीलंका दौऱ्यावर असेल. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीनंतर संघातील सलामीच्या जोडीचे स्थान रिक्त आहे. दरम्यान, श्रीलंका दौऱ्यात जैस्वाल आणि गिल यांना सलामीची जोडी म्हणून संधी देण्याची मागणी, माजी भारतीय क्रिकेटपटू सबा करीम यांनी केली आहे.
जैस्वाल-गिल यांना सलामीला खेळण्याची संधी द्यावी –
श्रीलंकविरुद्धच्या टी-२० मालिकेपूर्वी यशस्वी जैस्वाल आणि शुबमन गिल यांना सलामीला फलंदाजीची संधी द्यावी, अशी मागणी माजी यष्टिरक्षक फलंदाजाने केली आहे. खरे तर या जोडीने झिम्बाब्वे दौऱ्यावर भारताला चांगली सुरुवात करून दिली होते. अभिषेक शर्मालाही संघात स्थान द्यावे, अशी माजी भारतीय क्रिकेटपटू सबा करीम यांची इच्छा आहे.
माजी भारतीय क्रिकेटपटू सबा करीम म्हणाले, “सर्वात महत्त्वाची जागा फक्त टॉप ऑर्डरमध्ये असेल. मला वाटते की निवडकर्त्यांनी या दोघांसोबत (यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल) जावे. त्याचबरोबर अभिषेक शर्माला किमान १५ सदस्यांमध्ये तरी संधी द्यावी. कारण तुमच्याकडे ऋषभ पंत तिसऱ्या क्रमांकावर आणि सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी उपलब्ध आहेत.”
सबा करीम पुढे म्हणाले, “टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये कर्णधार कोण आहे यावरही हे अवलंबून आहे. गौतम गंभीर हे मुख्य प्रशिक्षक आहेत, त्यामुळे कर्णधार आणि मुख्य प्रशिक्षक यांची विचारसरणी काय आहे आणि त्यांना संघाला पुढे कसे न्यायचे आहे. त्यानुसारच खेळाडूंची निवड करावी लागेल. ऋतुराज गायकवाडही संघात आहे. अनेक खेळाडूंनी टॉप ऑर्डरमध्ये खेळण्यासाठी आपला दावा मजबूत केला आहे.”
तिसऱ्या क्रमांकावर अभिषेकची बॅट थंडावली –
त्याच्या यशस्वी आयपीएल हंगामानंतर, अभिषेक शर्माची झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड झाली. मात्र, पहिल्या सामन्यात तो शून्यावर बाद झाला. मात्र, त्याने दुसऱ्या सामन्यात ४६ चेंडूत शानदार शतक झळकावले. या डावखुऱ्या फलंदाजाने आपल्या खेळीत सात चौकार आणि आठ षटकार मारले. मात्र, तिसऱ्या सामन्यात जैस्वालचे पुनरागमन झाल्यानंतर त्याला तिसऱ्या क्रमांकावर खेळावे लागले. यानंतर पुढच्या दोन डावात तो १० आणि १४ धावाच करू शकला. त्याचबरोबर जैस्वालने ३६ आणि ९३* धावा केल्या.