स्पेनचा डेव्हिड फेरर, चेक प्रजासत्ताकची पेत्रा क्विटोवा यांनी संघर्षपूर्ण लढतीनंतर विजय मिळवत विम्बल्डन टेनिस स्पर्धेत आगेकूच कायम राखली. अग्रमानांकित सेरेना विल्यम्स व इंग्लंडचे आशास्थान असलेल्या लॉरा रॉब्सन यांना मात्र पराभवाला सामोरे जावे लागले.
चुरशीने झालेल्या लढतीत २४व्या मानांकित लॅबिनी लिसिकी हिने सेरेनाचे पुन्हा विजेतेपद मिळविण्याचे स्वप्न ६-२, १-६, ६-४ असे धुळीस मिळवले. शेवटपर्यंत रंगतदार झालेल्या या लढतीमधील तिसऱ्या सेटमध्ये सेरेनाने
३-० अशी आघाडी घेतली होती, मात्र लिसिकीने झुंजार खेळ करीत विजयश्री खेचून आणली. या सामन्यातील पराभवामुळे सेरेना हिला ६००वा विजय नोंदविण्याचा विक्रम करता आला नाही. आठव्या मानांकित क्विटोव्हा हिने सोरेझ नवारो या स्पॅनिश खेळाडूवर ७-६ (७-५), ६-३ अशी मात केली. चीनची खेळाडू ली ना हिने अपराजित्व राखताना इटलीच्या रॉबर्टा व्हिन्सीचा ६-२, ६-० असा धुव्वा उडविला. इस्तोनियाच्या केईया कानेपी हिने रॉब्सन हिची विजयी मालिका ७-६ (८-६), ७-५ अशी खंडित केली.
चौथ्या मानांकित फेरर याला क्रोएशियाच्या इव्हान डॉडिगविरुद्ध विजय मिळविण्यासाठी चार सेट्सपर्यंत झुंजावे लागले. त्याने हा सामना ६-७ (३-७), ७-६ (८-६), ६-१, ६-१ असा जिंकला. जेर्झी यानोविझ या पोलिश खेळाडूने ऑस्ट्रियाच्या जुर्गेन मेल्झेर याला ३-६, ७-६ (७-१), ६-४, ४-६, ६-४ असे पाच सेट्सच्या लढतीनंतर पराभूत केले. लुकास क्युबोट या पोलंडच्याच खेळाडूने आव्हान राखताना आद्रियन मॅनारिनो या फ्रेंच खेळाडूवर मात केली. त्याने पाच सेट्सच्या चिवट लढतीनंतर ४-६, ६-३, ३-६, ६-३, ६-४ असा विजय  मिळविला.
दुहेरीत रोहन बोपण्णाचे आव्हान कायम
भारताच्या रोहन बोपण्णा याने रॉजर व्हॅसेलीन याच्या साथीने आपले आव्हान टिकवले आहे. या जोडीने अ‍ॅलेक्झांडर पेया (ऑस्ट्रिया) व ब्रुनो सोरेझ (ब्राझील) यांच्यावर ६-४, ४-६, ७-६ (७-५), ६-२ असा संघर्षपूर्ण विजय मिळविला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा