मुंबईच्या रणजीपटूंचे मत
मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने अनेक विश्वविक्रम रचले, पण तरीही तो मुंबईच्या रणजी संघाला कधीही विसरला नाही. ज्या संघाने त्याला भारतीय संघापर्यंत पोहोचवले त्याबद्दल सचिनला आत्मीयता होती आणि ती कायम असेल, अशी मते त्याच्या रणजी संघातील माजी सहकाऱ्यांनी व्यक्त केली आहेत.
सचिनने जेव्हा मुंबईकडून पदार्पण केले तेव्हाचे संघाचे कर्णधार लालचंद रजपूत म्हणाले की, ‘‘जेव्हा सचिनला मी पहिल्यांदा पाहिले तेव्हा तो बालिश वाटत होता. एकदम लाजरा-बुजरा होता. पण जेव्हा तो मैदानात उतरला, तेव्हा त्याने आपल्या शतकी खेळीच्या जोरावर ‘मला बालिश समजू नका’ हे दाखवून दिले. एका ‘दादा’ फलंदाजासारखा तो पदार्पणाच्या सामन्यात खेळला. सचिनने त्यानंतर अनेक विश्वविक्रम रचले, पण त्याच्या मनात संघाबद्दल आणि खेळाडूंबद्दल नेहमीच प्रेम होते. गेली २४ वर्षे सचिनने आपल्या सर्वाना आनंद दिला आहे, त्यामुळे तो आता दिसणार नाही, हे पचनी पडत नाही. पण सचिन हा एकमेव आहे, दुसरा सचिन कधीही घडणार नाही. क्रिकेटचा विषय हा सचिनशिवाय नेहमीच अधुरा असेल.’’
सचिनबरोबर भारतीय संघात खेळलेले आणि त्यानंतर मुंबईचे प्रशिक्षक भूषवलेले प्रवीण अमरे म्हणाले की, ‘‘आचरेकर सरांकडे सचिनची पहिली ओळख झाली. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ईडन गार्डन्सवर पदार्पण करताना ४ बाद ६० अशी भारताची अवस्था असताना मी आणि सचिनने अर्धशतक झळकावून संघाला विजय मिळवून दिला होता. त्यानंतर मुंबईचे प्रशिक्षकपद मिळाले तेव्हा २००६-०७च्या रणजीच्या अंतिम फेरीत सचिन खेळला. तेव्हा त्याने बरेच विक्रम केले होते, पण तरीही तो संघाबरोबर राहिला. आपली रणनीती कशी असेल, याबद्दल त्याने चर्चा केली. कारण त्याला मुंबईबद्दल नेहमीच आपुलकी होती. आता सचिनच्या निवृत्तीचे दु:ख होते आहे, पण त्याच्या ऐतिहासिक दोनशेव्या सामन्याचे आपण साक्षीदार असू, याचा आनंद आहे. तो एक ‘चॅम्पियन’ खेळाडू होता व त्याचे क्रिकेटसाठी योगदानही फार मोठे आहे.’’
सचिनबरोबर शाळेपासून ते मुंबईच्या संघापर्यंत एकत्र खेळणारा अमोल मुझुमदार म्हणाला की, ‘‘सचिनबद्दल म्हणायचे तर तो अद्वितीय आहे. सचिनसारखा खेळाडू मी आतापर्यंत पाहिला नाही, त्याच्याबरोबर खेळायची संधी मिळाल्याबद्दल मी स्वत:ला सुदैवी समजतो. सचिनचे मुंबईच्या संघावर अपार प्रेम होते. एकदा तर आंतरराष्ट्रीय सामना संपवून विमानतळावरून तो थेट मुंबईच्या संघाच्या सरावाला हजर राहिला होता. सचिन आता यापुढे मैदानात खेळताना दिसणार नाही, ही कल्पना करवत नाही. पण आता तशी सवय करावी लागेल.’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा