साधारण अडीचचा सुमार असावा, सचिन तेंडुलकरने शिष्टाचारानुसार भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव संजय पटेल यांना दूरध्वनी केला आणि दोनशेव्या कसोटीनंतर आपण निवृत्त होणार असल्याचा मानस व्यक्त केला. हे ऐकताच पटेल यांना काय करावे आणि काय नाही, काहीच सुचत नव्हते. सचिनच्या निर्णयाने त्यांचा अक्षरश: त्रिफळा उडाला होता. काही क्षणांनंतर त्यांनी, ‘‘तू खरेच बोलतोयस का?’’ हा प्रश्न दोनदा विचारला, कारण त्यांचा सचिनच्या बोलण्यावर विश्वासच बसत नव्हता. सचिनने विनम्रपणे आपण जे बोललो ते पुन्हा एकदा स्पष्टपणे सांगितले.
‘‘सचिनने मला सांगितले की, त्याला निवृत्तीचा निर्णय जाहीर करायचा आहे. याआधीच त्याने निवृत्तीची कल्पना बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांना दिली होती आणि बीसीसीआयने याबाबत पत्रक काढावे आणि प्रसारमाध्यमांना ही माहिती द्यावी, असे त्याचे म्हणणे होते,’’ असे पटेल यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर दोन दशकांहून अधिक काळ अधिराज्य गाजवून, अनेकांसाठी ‘देव’ बनलेल्या सचिनच्या निवृत्तीचा निर्णय हा पचनी न पडणारा, धक्कादायक, असाच आहे. कारण सचिनला पुन्हा मैदानात पाहता येणार नाही, ही भावना करताच येणे शक्य नाही. ‘इंडियन एक्सप्रेस’ आणि ‘लोकसत्ता’ यांनी १८ सप्टेंबरला दिलेल्या निवृत्तीबाबतच्या बातमीनंतर सचिनवर फार दडपण आले होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन आणि सचिव संजय पटेल यांनी याबाबत सचिनशी चर्चा केली होती आणि त्याला आश्वस्त केले होते की, निवृत्तीचा निर्णय हा फक्त तुझाच असेल.
सचिनच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले की, ‘‘सचिन एका मोठय़ा खेळीसाठी थांबलेला होता, ती खेळी झाल्यावर तो निवृत्तीचा निर्णय घेणार होता. पण चॅम्पियन्स लीगमधील कामगिरीनंतर त्याने त्याचा निर्णय बदलला. कारण या स्पर्धेत त्याला अपेक्षेनुरूप कामगिरी करता आली नाही, त्याच्या धावा आटल्या असल्याचे त्याला वाटू लागले होते. आपल्याकडून धावा होत नाहीत, हे त्याला समजून चुकले आणि त्यामुळेच त्याने हा निर्णय जाहीर केला असावा.’’
सचिनने आतापर्यंत बरेच अपेक्षांचे ओझे उचलले, पण वयपरत्वे त्याच्या हालचाली मंदावल्या. यंदाच्या आयपीएलदरम्यान हैदराबाद सनरायजर्सविरुद्धच्या सामन्यात फिरकीपटू करण शर्माला षटकार मारल्यावर त्याचा डाव हात दुखावला आणि त्याला जखमी निवृत्त व्हावे लागले. त्यानंतर तो एकही आयपीएलचा सामना खेळला नाही, कारण त्याच्या हाताला जबरदस्त सूज आली होती. आयपीएलचे जेतेपद जिंकल्यावर त्याने आयपीएलमधून निवृत्तीचा निर्णय घेतला. त्यानंतर लंडनला जाऊन त्याने हातावर शस्त्रक्रिया केली आणि चॅम्पियन्स लीगमध्ये त्याने पुनरागमन केले. या स्पर्धेतील पाच सामन्यांमध्ये त्याच्या धावा अनुक्रमे १५, ३५, ०, ५ आणि १५ अशा होत्या. या स्पर्धेचे जेतेपद जिंकल्यावर त्याने स्पर्धेला अलविदा केला.
येत्या काही दिवसांतच सचिनचा दोनशेवा सामना मुंबईत होईल आणि त्यामध्ये त्याने पुन्हा एकदा गतदिवस आठवतील अशी फलंदाजी करावी, अशीच साऱ्या क्रिकेटरसिकांची इच्छा असेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा