काही खेळाडू हे सामान्यांच्या पलीकडचे असतात, त्यांचे वागणे काही वेळेला अचंबित करते, ते सामान्य वाटेवरून जात नाहीत आणि कामगिरीही अशी दमदार करतात की, त्याला काही तोडच नसते, म्हणूनच ते महान खेळाडू ठरतात, असेच एक उदाहरण म्हणजे भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर. सचिनने २००३च्या दक्षिण आफ्रिकेतील विश्वचषकात सर्वाधिक ६७३ धावा करत सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कारही पटकावला, पण या विश्वचषकात त्याने नेट्समध्ये एकही चेंडू खेळला नव्हता, हे सांगितल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि ही माहिती दिली आहे ती त्याचा सहकारी असलेला भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडने.
‘‘सचिनची सराव करण्याची पद्धत वेळेनुरूप बदलत होती. २००३च्या विश्वचषकाची तयारी करताना संपूर्ण स्पर्धेदरम्यान सचिन एकही चेंडू नेट्समध्ये खेळला नव्हता. तो फक्त ‘थ्रो-डाऊन्स’चा सराव करायचा. त्या वेळी सर्वानाच हे आश्चर्यकारक वाटले होते. याबाबत मी त्याला विचारल्यावर तो म्हणाला की, ‘मला नेट्समध्ये जाऊन सराव करण्यापेक्षा हे अधिक आवडते आणि मला आता ही लय बिघडवायची नाही.’ त्याच्या या सरावानंतर साऱ्यांनीच त्याची दमदार फलंदाजी या विश्वचषकात पाहिली,’’ असे द्रविडने सांगितले.
सचिनविषयी द्रविड म्हणाला की, ‘‘सचिनने भारतीय क्रिकेटचा चेहरा बदलून टाकला. त्याने एक पिढी घडवली. त्याचा खेळ पाहणे ही मेजवानी असायची. सचिन हा महानच आहे. सचिनसारख्या महान खेळाडूबरोबर खेळण्याचे मला भाग्य लाभले. तो सर्वासाठीच प्रेरणास्रोत आहे.’’
सचिनवर स्वार्थी असल्याचा आरोप केला जातो, याबद्दल विचारले असता तो म्हणाला की, ‘‘हा आरोप मला मान्य नाही. प्रत्येकाला धावा करायच्या असतात आणि जर खेळाडूने शतक झळकावले ते संघाच्या धावसंख्येमध्येही जमा होतात. त्याची काही शतके भारतासाठी फार महत्त्वपूर्ण ठरली.’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा