‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’ पुरस्काराने केले सन्मानित
क्रिकेटच्या अभिजात परंपरेचा झेंडा खांद्यावर त्याने घेतला.. अनेक विश्वविक्रम पादाक्रांत करत त्याने क्रिकेट जगतात एकामेवाद्वितीय होण्याचा मान पटकावला.. आपल्या अवीट, अविस्मरणीय, अद्भुत खेळींमधून त्याने स्वर्गीय आनंद फक्त देशवासीयांनाच दिला नाही, तर देशाच्या सीमा ओलांडून त्याने क्रिकेट विश्वातल्या प्रत्येक रसिकाला आपलेसे केले.. तो ज्या देशाविरुद्ध खेळतो, त्या देशातले प्रेक्षक त्याला उभे राहून मानवंदना देतात.. क्रिकेटचा सर्वार्थाने राजदूत ठरलेल्या सचिन तेंडुलकरला ऑस्ट्रेलिया सरकारने ‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देऊन कुर्निसात केला. क्रिकेटला दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल सचिनला हा पुरस्कार मंगळवारी झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात ऑस्ट्रेलियाच्या कला विभागाचे मंत्री सायमन क्रीन यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. यापूर्वी हा पुरस्कार भारताच्या मदर तेरेसा, एस. जे सोराबजी आणि विजय जोशी यांना प्रदान करण्यात आला आहे. तर ऑस्ट्रेलियाव्यतिरिक्त सर गॅरी सोबर्स, क्लाइव्ह लॉईड आणि ब्रायन लारा या क्रिकेटपटूंना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.
‘‘या पुरस्काराने मी भारावून गेलो आहे, आता नक्की काय बोलावं हे मला सुचत नाही. पण ऑस्ट्रेलियातल्या लोकांनी दिलेल्या प्रेमाला मी कधीच विसरू शकत नाही. मी प्रतिस्पर्धी संघाचा खेळाडू असूनही माझ्याकडून चांगली कामगिरी व्हावी, अशी ते नेहमीच अपेक्षा करायचे. ऑस्ट्रेलिया हा देश माझ्यासाठी नेहमीच अविस्मरणीय राहिलेला आहे. पर्थ आणि सिडनी मैदानातल्या खेळी मला अजूनही आठवतात, या खेळीनंतर प्रेक्षकांनी उभे राहून दिलेली मानवंदना आत्मविश्वास वाढवणारी होती. सिडनी हे क्रिकेट जगतातील माझे आवडते मैदान आहे. १९८५ साली मी पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाला गेलो होतो, त्यानंतर बऱ्यादचा मी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेलो आणि प्रेक्षकांकडूनच नेहमीच मला सन्मान मिळाला. ऑस्ट्रेलियात सच्चे क्रिकेट रसिक आहेत. आज मी जगातल्या सर्व गोलंदाजांचा सामना करतो, याचे श्रेय ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना आहे. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर मला नेहमीच चांगली गोलंदाजी खेळायला मिळाली आणि त्याचा फायदा मला कारकीर्दीत झाला,’’ असे सचिनने पुरस्कार स्वीकारल्यावर सांगितले.
याप्रसंगी सर डॉन ब्रॅडमन यांच्याबरोबरचा एक खुमासदार किस्साही सचिनने सांगितला. ‘‘सर डॉन यांनी मला भेटायला बोलावले होते, मीदेखील आनंदाने गेलो. कारण तो माझा सन्मान होता. पण त्यांच्याशी नेमके काय बोलायचे, याबाबत मी आणि शेन वॉर्न दोघेही दडपणाखाली होतो. वॉर्नने मला सुरुवात करायला सांगितली होती. गप्पांदरम्यान ‘आजच्या क्रिकेट जगतात फलंदाजाची सरासरी काय असायला हवी’ असा प्रश्न मी त्यांना विचारला होता. त्यावर त्यांनी ७० असे उत्तर दिले होते. त्यांच्या उत्तराने आम्ही दोघेही चकित झालो. कारण त्यांची सरासरी ९९ एवढी होती, मग सत्तरच का हा प्रश्न आम्हाला पडला, तसे त्यांना विचारल्यावर ते म्हणाले की, ‘आता ९०व्या वर्षी मी ७०च्याच सरासरीने धावा करू शकतो ना’. हे उत्तर ऐकल्यावर कार्यक्रमात एकच हशा पिकला, तेव्हा सचिनलाही हसू आवरले नाही.’’ पण त्या गत आठवणी सचिनच्या मनात अजूनही चीरतरुण आहेत, हे ऐकल्यावर ऑस्ट्रेलियाच्या लोकांनाही आश्चर्य वाटले.
पुरस्कार प्रदान करण्यापूर्वी क्रीन यांनी सचिनवर स्तुतिसुमनांचा वर्षांव केला. क्रिकेट या खेळाचा सचिन हा सच्चा कलाकार आहे. त्याचे विश्वविक्रम हे त्याचेच आहे, जो कोणी मोडीत काढू शकेल, असे वाटत नाही. सचिन भारताचा क्रिकेटपटू असला तरी त्याने त्याच्या अद्भुत खेळाच्या जोरावर सर्व देशाच्या सीमा ओलांडल्या आहेत. तो क्रिकेटचा वैश्विक राजदूत आहे. सचिनमुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशांतील संबंध वृद्धिंगत झाले आहेत. ऑस्ट्रेलियातील प्रत्येक क्रिकेट चाहत्याच्या मनात सचिनबद्दल आदर आहे आणि तो कायम राहील. तू कधीही ऑस्ट्रेलियात ये, खेळ, कितीही धावा कर, कारण तुला खेळताना पाहाणे आम्हाला एक अविस्मरणीय आनंद मिळतो. तुझा हा सन्मान करताना आम्हाला आनंद होत आहे, असे क्रीन म्हणाले. ऑस्ट्रेलियाच्या प्रेक्षकांना माझा खेळ आवडतो, म्हणून मी पुन्हा ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाईन, अशी अखेरच्या चेंडूवर सचिनने षटकार ठोकत साऱ्यांचीच फिरकी घेतली.
ऑस्ट्रेलियातल्या लोकांनी दिलेल्या प्रेमाला मी कधीच विसरू शकत नाही. मी प्रतिस्पर्धी संघाचा खेळाडू असूनही माझ्याकडून चांगली कामगिरी व्हावी, अशी ते नेहमीच अपेक्षा करायचे. ऑस्ट्रेलिया हा देश माझ्यासाठी नेहमीच अविस्मरणीय ठरला आहे. बऱ्याचदा मी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेलो आणि प्रेक्षकांकडून नेहमीच मला सन्मान मिळाला. ऑस्ट्रेलियात सच्चे क्रिकेट रसिक आहेत, त्यांच्या प्रेमाचा मला कधीही विसर पडणार नाही. –सचिन तेंडुलकर